राजापूर : स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढले तरच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल. भविष्यकाळात नोकऱ्या हा अत्यंत कठीण विषय होणार आहे. नोकऱ्या आणि जीवनाचा उद्धार याची सांगड घालण्याची गरज आहे. महिलांना तर त्यामधून कुटुंबाची आणि समाजाची क्रांती होऊ शकते. हाच कार्यक्रम आपल्याला भविष्यात राबवायचा असून, प्रत्येक पाच गावांमध्ये एक परिवर्तन केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी येत्या काळात रत्नागिरीत जनशिक्षण संस्था सुरू करण्याचा आपला मानस असल्याची माहिती खासदार सुरेश प्रभू यांनी दिली.खासदार सुरेश प्रभू सोमवारी राजापूर तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी राजापूर हायस्कूल येथे मानव साधन विकास केंद्र अंतर्गत परिवर्तन केंद्र, राजापूरतर्फे आयोजित स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींच्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. छाया जोशी उपस्थित होते.यावेळी खासदार सुरेश प्रभू म्हणाले की, विजेचा प्रश्न मिटविण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी ऊर्जामंत्री असताना ११० कोटी रुपये राखून ठेवले होते. जलविद्युत व्हावे म्हणून आपण प्रयत्न केले होते. मात्र, पुढच्या काळात हे प्रकल्प मार्गी लागू शकले नाहीत.
स्थानिक लोकांना रोजगार किंवा नोकऱ्या कशा मिळतील, हे पाहिले पाहिजे. या गोष्टी करण्याची प्राथमिक जबाबदारी सरकारची आहे, असे सुरेश प्रभू म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. प्रशांत पाध्ये यांनी केले, तर सूत्रसंचालन अॅड. सुशांत पवार यांनी केले.आत्मनिर्भरचा अर्थ समजापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा संदेश दिला आहे. केवळ रस्ते, वीज, पाणी म्हणजे देश नाही, तर देश म्हणजे देशाचे नागरिक. त्यातही अशा देशाचे नागरिक जे आजही विकासापासून वंचित आहेत. अशांना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. त्यांच्या जीवनात विकासाची गंगा कशी येईल, अशा लोकांना आत्मनिर्भर कसे करायचे यादृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत, असे सुरेश प्रभू म्हणाले.महिलांचा सन्मान कराआपल्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. समाजामध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर महिला खऱ्या अर्थाने सक्षम झाल्या पाहिजेत. जेव्हा महिला सक्षम होईल तेव्हा ते कुटंब आणि समाजही सक्षम होईल यासाठी केवळ एक दिवसाचा महिला दिन साजरा न करता कायमच महिलांचा सन्मान केला पाहिजे, असे प्रभू यांनी सांगितले.