रत्नागिरी: गेल्या चार-सहा दिवसांपासून रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचा वावर आढळून आला आहे. सकाळच्या वेळी झुंडीने इथे जेलिफिश पाहायला मिळत असून फिकट पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे हे जेलीफिश आहेत. अनेक मच्छीमारांनी जेलीफिश पाहिल्याचे सांगितले आहे. मिर्याबंदर ते गणपतीपुळे यासह जिल्ह्याच्या अन्य काही किनारी भागात जेलीफिश असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
नोव्हेंबर महिन्यामध्ये जेलीफिशचा वावर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वाढला होता. डिसेंबर महिन्यात प्रमाण कमी होऊ लागले. परंतु गेल्या आठ ते दहा दिवसात पुन्हा एकदा जेलीफिशच्या झुंडी रत्नागिरीच्या किनारी भागात आढळत आहेत. मिर्यापासून ते गणपतीपुळेपर्यंत मासेमारी करणार्यांच्या जाळ्यात हे जेलीफिश सापडत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात बांगडा मासा किनारी भागाकडून खोल समुद्राकडे वळला आहे. तसेच जेलीफिशच्या झुंडीमुळे मच्छीमारांच्या जाळ्यांचे ही नुकसान होत आहे. जेलिफीशच्या वावरामुळे पर्यटकांनी ह्या भागात फिरत असताना खबरदारी घेणं गरजेचे आहे.