रत्नागिरी : मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने मच्छिमार आर्थिक अडचणीत असताना त्यांच्यासमोर जेलीफिशचे नवे संकट उभे राहिले आहे. मासेमारीसाठी टाकण्यात येणाऱ्या जाळ्यांमध्ये विषारी जेलीफिश मिळत असल्याने मच्छिमार निराश झाले आहेत.
जेलीफिशच्या डंखामुळे मच्छिमार जखमी झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षात घडल्या आहेत. किनारपट्टी परिसरात या जेलीफिश आढळतात. ठराविक माेसमात हे जेलीफिश किनाऱ्यालगत येतात. त्यामुळे मच्छिमारांसाठी ते त्रासदायक ठरतात. पावसाळ्याआधी ब्लू बटन, पावसाळ्यात ब्लू बॉटल आणि पाऊस ओसरल्यावर बॉक्स जेलीफिश किनाऱ्यालगत येतात. वजनाने हलके असल्याने वाऱ्याच्या दिशेने हेलकावे खात ते समुद्र किनारी पोहोचतात. मोठ्या जेलीफिशचे शरीर १० इंच आकाराचे आणि दोरीसारखे २ फूट लांबीचे पाय असतात. जेलीफिशने एखाद्याला डंख मारल्यास त्या ठिकाणी लाल रंगाचे व्रण उठतात. त्यामुळे असह्य वेदना होतात.
समुद्रात मासेमारी करताना जाळीमध्ये अडकलेले जेलीफिश काढून फेकून देण्यात येतात. त्यावेळी खलाशांच्या हाताला त्यांचा तंतूमय भाग लागून खाज सुटते. यासाठी मच्छिमारांना समुद्रात जेलीफिश दिसल्यास त्या भागात मासेमारी करीत नाहीत. चुकून मासेमारी केल्यास जेलीफिश जाळ्यात अडकून मच्छिमारांचे मोठे नुकसान होते.
चौकट-
खोल समुद्रात मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने मच्छिमार आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे खलाशांचा, डिझेलचा खर्चही भागत नाही. तसेच डिझेलवरील सबसिडीच्या रकमेसाठी मच्छिमारांना वर्ष-वर्षभर प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच जेलीफिशचे संकट मच्छिमारांसमोर उभे राहिल्याने आणखीच आर्थिक अडचणीत आले आहेत.