रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे सुरू झालेले सामंत विरुद्ध राणे यांच्यातील फलक युद्धाचे लोण आता रत्नागिरी जिल्ह्यातही आले आहे. "झुंड में तो कुत्ते आते है, शेर अकेलाही आता है", असा इशारा देणारा खासदार नारायण राणे यांचा फलक थेट मंत्री उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य न मिळाल्याने खासदार नारायण राणे यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या कामाबाबत काहीशी खंत व्यक्त केली होती. त्यानंतर माजी खासदार नीलेश राणे यांनी सामंत यांच्यावर थेट आरोप करत त्यांनी निवडणुकीत अपेक्षित काम न केल्याचा आरोप केला होता.
या पार्श्वभूमीवर शनिवारी कणकवलीमध्ये मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचे छायाचित्र असलेला एक फलक शिवसेना कार्यालयाबाहेर झळकला. "वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे" असा इशारा या फलकातून देण्यात आला होता. राणे यांना त्यांच्या घरच्या मैदानावरच असा इशारा देण्यात आल्याने राणे यांच्याकडूनही त्याला उत्तर देण्यात आले, "आमची वेळ आली होती, तुमची वेळ येऊ देणार नाही" असा फलक नितेश राणे यांच्या छायाचित्रासह तेथे झळकला होता.
रविवारी सकाळी मंत्री उदय सामंत यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच पाली येथे त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नारायण राणे यांचे छायाचित्र असलेला फलक झळकला "झुंड में तो कुत्ते आते है, शेर हमेशा अकेलाही आता है" असे यावर नमूद आहे. निवडणूक निकालानंतर राणे आणि सामंत सुरू झालेले हे शीतयुद्ध आता थेट रस्त्यावर येऊ लागले आहे.