वैभव साळकर -- दोडामार्ग -महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या तत्कालीन युती शासनाच्या कार्यकाळात सुरू झालेली झुणकाभाकर योजना आता बंद आहे. मात्र, या योजनेच्या अनुषंगाने राज्यात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या झुणका भाकर केंद्राच्या इमारती मात्र विनावापर धूळ खात बंद असून, मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींची दुरूस्ती करून त्या बचतगटांसाठी उत्पादित केलेल्या मालासाठी विक्री केंद्र म्हणून उपलब्ध करून दिल्यास राज्यातील लाखो बचत गटांसाठी त्याचा फायदा होईल.१९९५ साली महाराष्ट्रात सेना-भाजपा युतीचे सरकार आले आणि त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचा मान मनोहर जोशी यांना मिळाला. १९ मार्च १९९५ ला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी एका महिन्यामध्ये २७ एप्रिल १९९५ ला राज्यात झुणका भाकर केंद्र चालविण्याबाबतची योजनेची घोषणा केली. १ मे १९९५ ला ही योजना अंमलात आली. गोरगरीब लोकांना १ रूपयात झुणका भाकर देण्याची ही योजना होती. या योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यात हजारो झुणका भाकर केंद्रे अस्तित्वात आली. पण सन २००० साली राज्यात युतीची सत्ता जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे आघाडी सरकार अस्तित्वात आले. या सरकारने युती शासनाच्या काळात सुरू झालेली झुणका भाकर योजना बंद केली. ही योजना बंद होऊन आता १६ वर्षे पूर्ण झाली. पण आजही झुणका भाकर केंद्राच्या इमारती मात्र राज्यात अनेक ठिकाणी धूळ खात विनावापर पडून आहेत. देखभाल दुरूस्ती अभावी ही झुणका भाकर केंद्रे मोडकळीस आली असून, जागेचा अपव्ययदेखील त्यामुळे होत आहे. ही योजना राबविण्यामागे त्यावेळी युती शासनाचा उद्देश समाजातील दुर्बल असहाय्य घटकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना सक्षम बनविण्याचा होता. पुढे ही योजना जरी बंद झाली, तरी बचत गट सक्षमीकरणासाठी चळवळ मात्र आघाडी शासनाच्या काळात सुरू झाली. बचत गट सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविल्या गेल्या आणि आजही त्या प्रभावीपणे रााबविल्या जात आहेत.बचतगट चळवळ व्यापक होईलआजच्या घडीला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बचतगट आहेत. या बचतगटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी विक्री केंद्रे आहेत. या इमारतींची दुरूस्ती करून त्या बचतगटासाठी उपलब्ध करून दिल्यास बचतगट सक्षमीकरणासाची चळवळ आणखीनच व्यापक होईल. परिणामत: या विनावापर पडून असलेल्या झुणका भाकर केंद्राच्या इमारती दुरूस्त करून बचतगटासाठी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा फायदा होणार आहे.
झुणका भाकर केंद्राच्या इमारती धूळ खात
By admin | Published: May 12, 2016 11:11 PM