अडरे : पत्रकारांना लस मोहिमेत प्राधान्य द्यायला हवे होते; पण सरकार किंवा कोणताही पुढारी यावर आश्वासन देत नाही. पत्रकारांना प्राधान्याने लस देण्यासाठी आराेग्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात येणार असून, याबाबत लवकर निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपचे जिल्हा कामगार सचिव जगदीश वाघुळदे यांनी दिला आहे़
प्रसारमाध्यमांशी बाेलताना जगदीश वाघुळदे म्हणाले की, प्रत्येक चांगल्या, वाईट बातम्या आपल्याला घरात बसून कळतात. कोरोना काळातही जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या पत्रकारांना लस मोहिमेत प्राधान्य द्यायला हवे. कोरोनामुळे वर्तमानपत्राचा कमी झालेला खप, त्यात कमी मिळणाऱ्या जाहिराती अशा परिस्थितीत कमी पगारावर काम करणारे पत्रकार आर्थिक संकटात सापडला आहे. त्यावर कोणताही विचार सरकार करीत नाही. आर्थिक घडी कशी बसवावी यावर घरामध्ये वाद विकोपाला जात आहेत़ त्यात बँक हप्ते, घरभाडे, वीज बिले यांची भर पडत आहे. आर्थिक परिस्थितीशी दोन हात करून पत्रकार प्रामाणिकपणे काम करीत आहेत. कोरोनाबाबतची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत. काेराेनाच्या काळात निदान लसीबाबत तरी पत्रकारांना प्राधान्य द्यायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे़ पत्रकारांना लसीमध्ये प्राधान्य देण्याबाबत लवकर निर्णय न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशाराही वाघुळदे यांनी दिला आहे़