रत्नागिरी : धावपळीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यात पत्रकारांनी आपल्या आरोग्याकडे कधीच दुर्लक्ष करता कामा नये. गंभीर परिणाम भोगायला लागल्यानंतर जाग येऊन उपयोग नाही. त्यासाठीच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी मोहीम रत्नागिरीतून सुरु करीत असल्याचे प्रतिपादन कै. सीताराम चाचे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चाचे यांनी येथे केले.चाचे ट्रस्टच्यावतीने रत्नागिरीतील केतन मंगल कार्यालयात सर्व पत्रकार, सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयांतील कर्मचारी आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आयुर्वेदाचार्य डॉ. अक्षता सप्रे, अनुपमा चाचे, धनश्री पालांडे, नितीन जाखी, डॉ. विशाल कुलकर्णी, डॉ. मंदार शहाणे, नेत्रतज्ज्ञ विलास मोरे, इसीजीतज्ज्ञ रवींद्र नाईक यावेळी उपस्थित होते.चाचे यांनी या ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून ग्रामीण भागातील गरजू जनतेची मोफत आरोग्य तपासणी मोहीम सुरु केली आहे. यावर्षीच्या अखेरीस ५ हजार जणांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यापूर्वी पोलीस यंत्रणा, सर्व शासकीय खात्यांचे अधिकारी यांचीही मोफत तपासणी करण्यात आली आहे. आता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसाठी ही मोहीम सुरु करण्यात आली असून, त्याची सुरुवात रत्नागिरीतून करण्यात आली आहे. यावेळी पत्रकार बांधवांचे रक्तगट, रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल, ईसीजी, ब्लडप्रेशर तपासून नेत्रतपासणी करण्यात आली. यासाठी डॉ. विशाल कुलकर्णी, डॉ. मंदार शहाणे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
पत्रकारांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये : चाचे
By admin | Published: December 04, 2014 10:42 PM