रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जेथे गरज आहे आणि शक्य आहे, अशा ठिकाणी तातडीने बेड वाढवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्याहीपेक्षा गरज वाढली तर एखाद्या मैदानावर जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची तयारीही करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ‘लोकमत’ला दिली. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांची चर्चा झाली आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रत्नागिरीही त्याला अपवाद नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक प्रभावी आहे. यात संसर्ग अधिक वेगाने होत आहे. त्यामुळेच संचारबंदीची अंमलबजावणी कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.
सद्यस्थितीत जिल्ह्यात पुरेसे बेडस् उपलब्ध आहेत. मात्र रुग्णवाढीचा विचार करता हे बेड्स कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज आहे आणि शक्य आहे तेथे बेड्स वाढवून देण्याची तयारी करण्यात आली आहे. रत्नागिरीतील महिला रुग्णालयात आणखी १६५ बेड्स वाढवून देण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सुरू केली आहे. इतरही काही ठिकाणी बेड्स वाढवून दिले जात आहेत. यानंतरही गरज वाटली तर एखाद्या मैदानावर जम्बो कोविड सेंटर उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. किमान ५०० बेड्स आणि तेही ऑक्सिजन पुरवठा असलेले बेड्स या सेंटरवर तैनात केले जातील. कोणत्याही रुग्णाचे हाल होऊ नयेत, कोणीही रुग्ण उपचाराविना राहू नये, याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरीतील जम्बो कोविड सेंटरबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे, असेही ते म्हणाले.
नियमांचे पालन कराच
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मोठा आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, मात्र नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. जर नियमांचे पालन झाले तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यात खूप मोठी मदत होईल. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदी गांभीर्याने घ्यावी, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.