आॅनलाईन लोकमतदेवरूख (जि. रत्नागिरी), दि. २४ : संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथील जाखमाता मंदिराजवळील चिंचेचे जुनाट झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने कसबा-नायरी मार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प होती. झाडाखाली असलेल्या महिलांनी पलायन केल्याने त्या बालंबाल बचावल्या. गेले दोन दिवस मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्याला झोडपून काढले आहे. धो-धो पावसाबरोबर सोसाट्याचा वारा असल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळणे, वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडत आहेत. रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फणसवणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जाखमाता मंदिराजवळ रस्त्यानजीक असलेले चिंचेचे झाड कोसळले. यामुळे संगमेश्वर ते नायरीकडे जाणारी एस्. टी. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसून आले.याच झाडाच्या आसऱ्याला काही महिला बसच्या प्रतीक्षेत होत्या. परंतु, झाड हळूहळू पडत असल्याचे निदर्शनास येताच तेथील महिलांनी तत्काळ काढता पाय घेतला. या मार्गावरून पादचारी तसेच वाहनांची ये-जा सुरू असते. सुदैवाने यावेळी पादचारी व वाहने नसल्याने अनर्थ ठळला आहे. झाड पडल्याची माहिती मिळताच गावचे सरपंच, सदस्य, ग्रामस्थांनी धाव घेत झाड हटविण्याची मोहीम हाती घेतली.
रामपूर येथे गोठा कोसळला
चिपळूण : तालुक्यातील रामपूर -कुंभारवाडी येथे पावसामुळे गोठा कोसळून नुकसान झाले आहे. रामपूर - कुंभारवाडी येथील काशिनाथ गोपाळ काजवेकर यांच्या मालकीचा गोठा जोरदार पावसामुळे कोसळला. गेले दोन दिवस चिपळूण तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. अधूनमधून वादळी वाऱ्यासह पावसाच्या दमदार सरी कोसळत होत्या. यामुळे ग्रामीण भागात किरकोळ पडझड झाली आहे.