खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर मालवाहू ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने महामार्ग सुमारे दोन तास ठप्प झाला होता. वाहतूक व स्थानिक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने रस्त्यात बंद पडलेला मालवाहू ट्रक बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.सध्या उन्हाळी सुटी आणि लग्नसराई असल्याने मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. उन्हाळी सुटीचा आनंद उपभोगण्यासाठी कोकणात तसेच कोकणमार्गे गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी असल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील रहदारी कमालीची वाढली आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याने अनेक ठिकाणी रहदारीचा वेग मंदावू लागला आहे. त्यातच आज दुपारी खेडनजीकच्या जगबुडी पुलावर एक अवजड मालवाहू ट्रक नादुरूस्त होऊन रस्त्याच्या मधोमध बंद पडला.चालकाने बंद पडलेला ट्रक सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ट्रकमधील बिघाड दूर होऊ न शकल्याने मुंबई - गोवा महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला. मुंबईहून गावाला निघालेले अनेक चाकरमानी रस्त्यातच अडकून पडले.
काही वाहनचालकांनी भरणे नाका येथून व्हाया खेड शहरमार्गे चिपळूणकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरणे-खेड रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याने महामार्गही वाहतुकीसाठी बंद झाला.रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाल्याची खबर पोलिसांना मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.