गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः!
संस्कृत सुभाषिताच्या या ओळी सध्या वर्षांतून दोन वेळा हमखास प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. गुरुजनांबद्दल असणारा आदर बहुतांशी शिष्य या दोन दिवसांत संपवून टाकतात. त्यामुळे वर्षांतील उर्वरित दिवस या शिष्य मंडळींसाठी गुरुजन सामान्य बनतात. गुरुपौर्णिमा व शिक्षक दिनाला आपल्या गुरूवर भरभरून लिहिणाऱ्या या शिष्यांना इतरवेळी गुरुजनांच्या नसलेल्या चुकाही प्रखरतेने जाणवायला लागतात. प्रखरपणे त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या हाडामांसाच्या माणसाला निरंतर गुरूस्थानी का पाहिलं जात नाही, ही विचार करायला लावणारी वस्तुस्थिती आहे. वर्गामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आत्मसन्मानाच्या गोष्टी शिकवणारे गुरुजनही कधीकधी त्यांच्या खऱ्या आयुष्यात मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकवेळा आत्मसन्मान गहाण ठेवताना पाहायला मिळतात. लाचारीमुळे ज्ञानाचा अंत होतो असे म्हणतात. वास्तविकपणे ज्ञानदान करणाऱ्या या गुरुजनांना आपल्या व्यवस्थेनेच लाचार बनविले आहे, असे वाटत नाही का? गुरुजनांना लाचार बनविण्यामध्ये नियम गुंडाळून ठेवत गैरप्रकारांना राजरोस खतपाणी घालणारी शिक्षण विभागातील एक यंत्रणाच जबाबदार आहे.
आश्रम काळामध्ये गुरुजनांना मिळणारा सन्मान आजच्या गुरुजनांना मिळावा इतकी उदात्त अपेक्षा शिक्षकांची निश्चितच नाही. पण, किमान सर्वसामान्य माणसाइतका सन्मान त्यांना मिळालाच पाहिजे. निर्जीव घटकांसोबत काम करणाऱ्यांना आपण ‘साहेब’ उपाधी देतो आणि एखाद्या कुशल कुंभाराप्रमाणे बालमनाला आकार देणाऱ्या गुरुजनांना मात्र... हा निश्चितच देशाचा शैक्षणिक दर्जा ठरविण्यास कारणीभूत ठरणारा एक घटक आहे. खरंतर, या देशाचे राष्ट्रपती पद शिक्षकाने भूषविले आहे. या एका उदाहरणातून या पेशाचे मोठेपण लक्षात येते.
कोरोना काळात शिक्षकांनी त्यांच्या सेवेची व्यापकता अधिक वाढविली आहे. शिक्षकांना काहीच काम नाही, फुकट पगार घेतात म्हणणाऱ्यांना ही एक चपराकच आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्यांच्याकडे शिक्षकांचे पालकत्व आहे, अशी बहुतांशी साहेब मंडळीही याला अपवाद नाहीत. ज्यांच्या कार्य तत्परतेबद्दल ‘दिव्याखाली अंधार’ इतकेच बोलता येईल.
आपले दैनंदिन काम सांभाळून, समस्यांचे भांडवल न करता आपत्तीमध्ये सापडलेल्या देशवासीयांना मदत करण्याची या गुरुजनांची भावना निश्चितच समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. इतर वेळी चार भिंतींमध्ये विद्यार्थ्यांवर संस्कार बिंबविणारे गुरुजन कोरोना काळात ‘पोलीस मित्र’ बनून रस्त्यावर उभे राहिले. वैद्यकीय क्षेत्राशी कसलाही संबंध नसताना ‘आरोग्यसेवक’ बनले. एखाद्या वैद्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात पडेल ते काम केले. या सर्वांचे शिखर म्हणजे वादळ, महापूर यांचे पंचनामे शिक्षकांनी केले आणि प्रशासनाने त्यांना २४ तास धरणावर लक्ष ठेवण्याचे कामही दिले. जेव्हा कोरोनाग्रस्तांपासून रक्तातील नाती पळ काढत होती तेव्हा शिक्षक मात्र आपल्या कर्तव्याचे भान राखत क्वारंटाइन केंद्रांवर त्यांची सेवा करीत होते. किमान या बांधिलकीचे भान तरी समाजाने ठेवावे आणि शिक्षकांची हेटाळणी थांबवावी, अशी अपेक्षा!
- सागर पाटील, टेंभ्ये