खेड तालुक्यातील लाेटे-परशुराम औद्याेगिक वसाहतीत काेका-काेला प्रकल्पासाठी पाहणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आवाशी : गेली अनेक वर्षांपासून भूसंपादन केलेल्या लोटे-परशुराम अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत कोका-कोला प्रकल्प प्रस्तावित असून, त्या अनुषंगाने गुरुवारी येथील जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत विस्तारित क्षेत्रात अनेक वर्षांपासून प्रकल्पाविना एमआयडीसीची जागा विनावापर पडून आहे. कोकण रेल्वे व मत्स्य प्रक्रिया प्रकल्पाव्यतिरिक्त येथे अन्य प्रकल्प येत आहेत. याचीच चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र आता येथे कोका-कोला प्रकल्प येण्याचे निश्चित झाले असून, गुरुवारी येथील जागेची पाहणी करण्यात आली. गेले दोन दिवस अधिकारी लोटेच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून लवकरच प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने पुढील हालचाली सुरू आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमेरिका दौऱ्यात न्यू यॉर्क येथील शीतपेय बनविणाऱ्या जगविख्यात कोका-कोला कंपनीसोबत करार करण्यात आला होता. हा प्रकल्प लोटे विस्तारित म्हणजेच लवेल, दाभीळ व सात्विणगाव परिसरातील ६५० हेक्टर क्षेत्रातील जागा निश्चित करण्यात आली होती. त्यादृष्टीने प्रकल्प अधिकाऱ्यांनी यापूर्वी येथे येऊन जागेची पाहणी करत हवा, पाणी, माती यांचे नमुनेही घेतले होते. मात्र त्यानंतर पुढे काहीच हालचाली न होता हा प्रकल्प बारामतीला निघून गेला. मात्र, आता तो पुन्हा लोटे येथे येत असून, काही दिवसांपूर्वीच एमआयडीसीबरोबर चर्चा करून हा प्रकल्प येथे उभारण्याचा निर्णय झाला आहे. त्यादृष्टीने प्रकल्प उभारणीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. बुधवारी प्रकल्पाचे साथीया कनन, जोसेफ कुलकर्णी यांच्यासह एकूण पाच अधिकाऱ्यांचे चिपळुणात आगमन झाले. गुरुवारी त्यांनी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडाळकर, नियोजनचे कुलकर्णी, कार्यकारी अभियंता राक्षे, उपअभियंता सी.ए. भगत यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसमवेत लोटे येथील प्रकल्पस्थळांची पाहणी केली. प्रथम ९० एकर जागा या प्रकल्पासाठी देण्यात आली असून, या जागेतील रस्ता व अन्य समस्यांबाबत पाहणी करून माहिती घेतली.