लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गतवर्षीपासून काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला आणि अनेक मदतीचे हात पुढे आले. पाेलिसांबराेबरच अनेकजण रस्त्यावर उतरून काम करत आहेत. यामध्ये एक्स एनसीसी मुलांचाही सहभाग आहे. ही मुलं गेल्यावर्षीपासून विनामानधन काम करत आहेत. या मुलांच्या सेवाभावी वृत्तीचे काैतुक जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. माेहितकुमार गर्ग यांच्याकडून करण्यात आले.
जिल्ह्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या काळात पाेलीस दलाकडून ठिकठिकाणी बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी बंदाेबस्ताची जबाबदारी पार पाडत असताना घरातून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना अटकाव करण्यात येत आहे. या कामासाठी अनेकजण पाेलिसांच्या मदतीला आले आहेत. पाेलिसांबराेबरच रस्त्यावर उभे राहून मदत करत आहेत. या कामात एनसीसीच्या मुलांनीही सहभाग घेतला आहे. ही मुले नि:स्वार्थी भावनेने पाेलिसांच्या खांदाला खांदा लावून काम करत आहेत. या मुलांच्या पाठीवर काैतुकाची थाप मारण्याचे काम पाेलीस अधीक्षक डाॅ. गर्ग यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी गुरुवारी पोलीस मित्रांना टी-शर्ट व टोपीचे वाटप केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने व शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड उपस्थित होते.
ही सर्व मुले पोलीस मित्र म्हणून अहोरात्र पोलिसांबरोबर रस्त्यावर उभी राहून काम करत आहेत. गुरूवारी एकूण २८ पोलीस मित्रांना पोलीस दलाकडून टी-शर्ट व टोपीचे वाटप करण्यात आले. या पोलीस मित्रांना नाकाबंदीच्या ठिकाणी जाऊन वाटप केल्याने पोलीस मित्रांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. या कार्यक्रमाचे नियोजन शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड व कर्मचारी यांनी केले होते.