पाचल : महाराष्ट्र शासनाने ४ डिसेंबर २०१५ मध्ये काजिर्डा-जामदा प्रकल्पाची घोषणा केली. मात्र, या प्रकल्पाला ग्रामस्थांचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून, हे काम दडपशाहीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकल्पाविरोधात काजिर्डा येथील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.गेली २५ वर्षे जामदा प्रकल्पाविरोधी लढा प्राणपणाने लढत आहे. प्रकल्पाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रक्रणी न्यायालयात या प्रकल्पाची चौकशी सुरू होती. त्यामुळे या प्रकल्पाचे काम तब्बल आठ ते दहा वर्षे बंद होते. मात्र, आता या प्रकल्पाचे काम ग्रामस्थांना विश्वासात न घेता दडपशाहीने सुरू करण्यात आले आहे. प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत न्यायालयाच्या चौकशीचे काय झाले, काम सुरू करण्याबाबत न्यायालयाचा काय आदेश आहे, याबाबत अधिकारी व ठेकेदार काहीही बोलण्यास तयार नाही. ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती न देता, त्यांच्याशी कोणतीही चर्चा अथवा बैठक न घेता पोलिस फौजफाटा उभा करून ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अधिकारी व ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून, प्रकल्पस्थळीच लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन छेडण्याच्या इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.धरणाचे काम सुरू करण्यापूर्वी ५० टक्के पुनर्वसन झाल्यानंतरच धरणाचे काम सुरू करावयाचे असते. धरणाचे काम सुरू करण्यापूर्वी ग्रामस्थ, अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन पुनर्वसन कुठे करणार, धरणग्रस्तांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देणार, पुनर्वसनाचा संपूर्ण आराखडा ग्रामस्थांसमोर मांडावयाचा असतो.
मात्र, याबाबत ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता, शासन नियम-निकष बाजूला ठेवून काम सुरू आहे. अधिकाऱ्यांना चर्चेसाठी निवेदन व निमंत्रण देऊनही जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे काजिर्डा ग्रामस्थांनी धरण प्रकल्प अधिकारी, ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.