खेड : तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा कोविड रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी ५० बेड उपलब्ध आहेत. हे सर्वच्या सर्व बेड रुग्णांनी भरले आहेत. शिवाय ९ संशयित रुग्णही या रुग्णालयात उपचार घेत आहेत. एकूण ५० खाटांच्या या रुग्णालयात ५७ रुग्ण उपचार घेत आहेत. खेड, दापोली, मंडणगड या तीनही तालुक्यात अशीच परिस्थिती असल्याचे तीन तालुक्याचे कोविड कमांडिंग अधिकारी डॉ. संभाजी गरुड यांनी सांगितले.
तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे कोविड रुग्णालय मंजूर आहे. मात्र आता प्रत्यक्षात ४८ रुग्ण आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचारार्थ दाखल आहेत. त्यापैकी १६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. व्हेन्टिलेटरवर उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा सोमवारी दि. १९ रोजी मृत्यू झाला आहे. कोरोनासंशयित ९ रुग्णदेखील येथेच उपचार घेत आहेत. त्यामुळे एकूण ५७ रुग्णांवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खेडमध्ये लवेल येथील घरडा सीसीसीमध्ये ७५, तर खेड नगरपालिका सीसीसीमध्ये २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
खेडमध्ये आता गरजू रुग्णांना बेड मिळणे आवश्यक असून, जे रुग्ण कोरोनाबाधित आहेत त्यापैकी ज्यांची प्रकृती स्थिर आहे, अशा रुग्णांना कोविड केअर सेंटर लवेल अथवा नगरपालिका येथे दाखल करण्यात येत आहे. शिवाय खासगी कोविड केअर सेंटर असलेल्या घरडा हॉस्पिटल येथेही दाखल करण्यात येत आहे. मात्र ज्यांची प्रकृती खराब आहे, ज्यांना ऑक्सिजनची नितांत गरज आहे, अशाच रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले जात आहे. रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था पुरेशी असून, २४ सिलिंडर व एक ड्युरा सिलिंडर आहे, असे डॉ. संभाजी गरुड यांनी सांगितले आहे.