विहार तेंडुलकर
रत्नागिरी : ज्या कल्पवृक्षाला सर्वच ठिकाणी महत्त्वाचे स्थान आहे तो नारळ आणि नारळाचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याकडे पाहिले जायचे, तो रत्नागिरी हे समीकरण आता बदलू लागले आहे. कारण कोकणातील लोकसंख्या, नारळाची असलेली मागणी आणि उत्पादन हे प्रमाण आता व्यस्त होऊ लागले असून, त्यामुळे नारळाच्या या जिल्ह्यावर नारळासाठी पश्चिम महाराष्ट्रावर विशेष करून कोल्हापूरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.एकेकाळी रत्नागिरी जिल्ह्यातून नारळ मोठ्या प्रमाणावर आयात होत होता. राजापूरचे खोबरे तर महाराष्ट्रात प्रसिध्द होते. पण आज रत्नागिरीवरच नारळ आयात करण्याची वेळ आली आहे. कारण नारळाचे उत्पादन कमी झाले असे नाही तर नारळाची मागणी वाढली आहे आणि त्यापुढे मिळणारे उत्पादन हे खूपच कमी झाले आहे. त्यामुळे नारळासाठी आता पश्चिम महाराष्ट्रावर विशेष करून कोल्हापूरवर अवलंबून राहण्याची वेळ रत्नागिरीवर आली आहे.रत्नागिरीकरांना आर्थिक आधार देणारे आंबा, काजूबरोबरच नारळ हेही एक पीक होते. परंतु, गेल्या काही वर्षात नारळाच्या लागवडीकडे मोठे दुर्लक्ष झाले आहे. विशेष म्हणजे शासनानेही नारळ लागवडीला चालना देण्याच्यादृष्टीने कोणतीही योजना आखलेली नाही. त्यामुळे नारळ लागवडीपासून शेतकरी दूरच राहिला आहे.
कोकणात जेवण असो वा शुभ-अशुभ घटना, त्यामध्ये नारळाचे महत्त्व मोठे आहे. पूर्वीच्या काळात नारळाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. विशेष करून समुद्र वा नदीच्या काठी मोठ्या प्रमाणावर नारळ लागवड आजही पाहायला मिळते. परंतु, गेल्या १० ते १५ वर्षात रत्नागिरीत फ्लॅट संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे.
ज्यांनी मोठी जमीन घेऊन घर उभे केले आहे, त्यांच्याकडे केवळ दोन ते चार नारळाची वृक्षलागवड केलेली आहे, उर्वरितांना बाजारपेठेतील नारळावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे नारळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.काही वर्षांपूर्वी केवळ नारळ हाच एक उत्पादन देणारा पदार्थ होता. आज नारळापेक्षाही शहाळ्यांना जास्त दर मिळत असल्याने बागायतदार नारळ तयार होण्यापूर्वीच शहाळी काढून ती विकतात, त्यामुळेही नारळाच्या प्रत्यक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे.
नारळाचे उत्पादन घेताना त्याचे व्यवस्थापनही व्यवस्थित होत नसल्याने नारळावर सोंड्या भुंगा, गेंड्या भुंगा, पांढरी माशी असे रोग पडतात. या रोगांचे प्रमाण वाढल्याने बागायतदारांनी नारळाच्या आरोग्याकडेही लक्ष पुरवणे गरजेचे आहे.रत्नागिरीत नारळ उत्पादन खूपच कमीरत्नागिरीकरांनी गेल्या अनेक वर्षात केवळ आंबा, काजूच्या उत्पादनाकडेच फार लक्ष पुरवले तर दुसरीकडे नारळाचे उत्पादनाकडे दुर्लक्ष केले. सिंधुदुर्ग जो जिल्हा रत्नागिरीपेक्षा खूपच लहान आहे. त्या जिल्ह्यात नारळाखालील क्षेत्र हे १५ हजार ६३८ हेक्टर एवढे आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात नारळाखालील क्षेत्र हे ५ हजार ६०० हेक्टर एवढे आहे.नारळ लागवडीचे देशातील चित्रकेरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओरिसा, गोवा, पश्चिम बंगाल, पाँडेचरी, महाराष्ट्र आणि अंदमान-निकोबार या राज्यात प्रामुख्याने नारळाचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांचे देशातील एकूण नारळाखालील क्षेत्रापैकी ८८ टक्के क्षेत्र व्यापले आहे तर देशाच्या एकूण नारळ उत्पादनातही ९० टक्के वाटा या राज्यांचा आहे.कोकणातील उत्पादनासमोर समस्यातुकड्यातुकड्यांची असलेली जमीन, कीडरोगांचा प्रादुर्भाव, नारळाच्या झाडावर चढणाऱ्या मजुरांची कमतरता आणि नारळ उत्पादन घेण्याबाबत असलेल्या ज्ञानाचा अभाव यामुळे कोकणात अन्य राज्यांच्या तुलनेत कोकणात नारळाचे उत्पादन कमी आहे. महाराष्ट्रातील ९५ टक्के नारळ उत्पादन कोकणात होत असले तरी अन्य राज्यांच्या तुलनेत हे उत्पादन कमी आहे.अर्थकारण घडू शकते..कोकणातील हवामानाची स्थिती पाहिली तर एक नारळाचे झाड प्रतिवर्ष ८० ते १६० नारळ देऊ शकते. ज्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत होते ३ हजार २०० रुपये. नारळाइतकी अर्थकारणाची हमी आजच्या काळात हापूसही देऊ शकत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर रत्नागिरीनजीकच्या भाट्येतील नारळ संशोधन केंद्रात एकूण ४ हजार ४५६ नारळाची झाडे आहेत. त्यापैकी ४ हजार २०० झाडे उत्पादनक्षम असून, त्यांचे वार्षिक उत्पन्न ९५ लाख रुपये एवढे आहे. यावरून नारळ उत्पादन किती किफायतशीर आहे, याची कल्पना येईल.नारळ ४० रुपयांपर्यंतनारळ हा स्वयंपाकातील एक अविभाज्य घटक बनला आहेच; परंतु शुभ-अशुभ कार्यातही नारळाचे आगळे स्थान असल्याने लग्न हंगाम, व्रतवैकल्यांचा महिना आला की नारळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढतात. ज्याठिकाणी नारळ मोठ्या प्रमाणात उत्पादीत होत होता, त्या रत्नागिरीत गेल्या श्रावण महिन्यात ३५ ते ४० रुपये दराने नारळ घेण्याची वेळ आली होती. सध्या रत्नागिरीत नारळ २० ते २५ रुपये दराने विकला जातो.कोकणच्या नारळाची तऱ्हाच न्यारीपूर्वीच्या काळात असं म्हटलं जायचं की, निसर्ग जेथे जी गोष्ट पिकवतो, तेथेच ती चांगली होते. परंतु, आताच्या आधुनिक युगात सर्वच फळं सर्वच ठिकाणी जरूर होऊ लागली. परंतु, त्या फळाच्या गुणवत्तेत मात्र कायम फरक राहिला.
कोकणातील नारळात कॅल्शिअम, पोटॅशिअम याचे प्रमाण पश्चिम महाराष्ट्रातील नारळापेक्षा ०.३ टक्क्यांनी जास्त आहे. याशिवाय कोकणातील नारळामध्ये तेलाचे प्रमाण हे ६७ ते ६८ टक्के जास्त असते. येथील दमट हवामानामुळे नारळाचे पीक चांगले येते तर पश्चिम महाराष्ट्रात हवामान उष्ण असल्याने तेथे नारळाच्या झाडाला फुलोरा येतो, परंतु उत्पादन कमी होते. त्यामुळे कोकणात विशेष करून रत्नागिरीत नारळाच्या उत्पादनाकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे.- डॉ. वैभव शिंदे,कृषी विद्यावेत्ता, नारळ संशोधन केंद्र, भाट्ये
महाराष्ट्र आणि नारळ उत्पादनमहाराष्ट्रातील ९५ टक्के नारळ उत्पादन हे कोकणात होते. यातील बहुसंख्य नारळ उत्पादन हे समुद्र वा नदीकिनारी घेतले जाते. देशाच्या नारळाखालील क्षेत्रापैकी १.४२ टक्के क्षेत्र हे महाराष्ट्रातील आहे तर एकूण उत्पादनात ०.९२ टक्के नारळ उत्पादन हे महाराष्ट्रात आहे.उत्पादनाविषयी गैरसमजकोकणातील लोकांमध्ये आंबा, काजू हेच वार्षिक उत्पादन मिळवून देणारे व्यवसाय आहेत, असा गैरसमज आहे. परंतु, नारळ हे वर्षभर फळ देणारे झाड आहे आणि त्याला आता बाजारपेठेत मोठी मागणीही आहे, हे कोकणी माणूस सहजपणे विसरून जातो.आरोग्यदायी नारळआईच्या दुधानंतर नारळाच्या दुधाचा नंबर लागतो, ज्यामध्ये फ्लोरिक अॅसिड असते जे स्मृतीभ्रंशावर एक चांगला उपाय आहे. नारळाच्या पाण्यात सोडियम असते, जे शरिराला आवश्यक असते. सोडियमचे प्रमाण घटले तर माणूस कोमात जाऊ शकतो. शहाळ्यांच्या पाण्याचा कोणताही अपाय नसतो. त्यामुळे बºयाचवेळा रुग्णांना डॉक्टर शहाळ्याचे पाणी पिण्याचा सल्ला देतात.मागणी अन् उत्पादनात व्यस्त प्रमाणरत्नागिरीत नारळाच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष झाले हे खरे आहे; परंतु नारळाखालील क्षेत्र पूर्वीपेक्षा कमी झालेले नाही. उलट मागणी वाढली आहे. नारळ खाण्याचे प्रमाण कोकणात खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचबरोबर प्रत्येक कार्यात नारळ वापरला जातो. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात नारळ स्वयंपाकात वापरला जात नाही. त्यामुळे तेथे वापर कमी अन् त्यामानाने उत्पादन जास्त तर कोकणात उत्पादन कमी अन् वापर जास्त असे विचित्र प्रमाण आहे.
रत्नागिरीतील पर्यटनस्थळांमध्ये शहाळ्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते, नारळापेक्षा त्याला दर चांगला मिळत असल्याने बागायतदार शहाळी विक्रीकडे वळले आहेत. गेल्या काही वर्षात गुहागर, चिपळुणात लागवड वाढलेय, पण ती जिल्ह्यात वाढायला हवी तरंच रत्नागिरीला नारळासाठी पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून राहावे लागणार नाही.-डॉ. दिलीप नागवेकर, माजी कृषी विद्यावेत्ता, नारळ संशोधन केंद्र
नारळ लागवड केली आणि..हेमंत फाटक, (राहणार चिंचखरी ता. रत्नागिरी) यांची वडिलोपार्जित ३२ एकर जमीन. त्यामध्ये आंबा, काजूची कलमे, त्यामध्ये नवीन प्रयोग करण्यासाठी बँकेचे कर्ज काढले; परंतु कर्जाचे हप्तेही भागत नव्हते. त्यावेळी आत्महत्येचा विचार आला होता; परंतु त्याचवेळी भाट्ये नारळ संशोधन केंद्राचे मार्गदर्शन मिळाले आणि नारळ लागवडीकडे वळलो. रासायनिक खतांचा नाद सोडला आणि जैविक खताचा वापर सुरु केला.
सध्या नारळाचे एक झाड ८० नारळ देते. पुढील २-३ वर्षात प्रत्येक झाड १००पर्यंत नारळ नक्कीच देईल. या नारळ लागवडीमुळेच जगण्याचा एक आधार मिळाला. आताच्या काळात हापूस हा कायदेशीर जुगार झालाय तर नारळ हे एटीएम. नारळ हे नाशिवंत फळ नाही, बाराही महिने मिळणारे उत्पन्न आहे आणि बाजारपेठेत किंमतही चांगली मिळते. त्यामुळे किफायतशीर बागायतीसाठी सध्याच्या काळात नारळाशिवाय पर्याय नाही, असे फाटक सांगतात.