चिपळूण : कळवंडे धरण दुरुस्तीचे काम ठेकेदाराने निकृष्ट केले आहे. अनुभव नसलेल्या ठेकेदाराला काम देण्यात आले. ठेकेदार अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्यानेच धरण दुरुस्तीची कामे निकृष्ट झाली आहेत. त्यातून धरणाला धोका पोहोचण्याचा संभव आहे, असा आरोप आमदार भास्कर जाधव तसेच ग्रामस्थांनी केला. मात्र, धरणाला कोणताही धोका नसून लवकरच दुरुस्तीची कामे योग्यप्रकारे मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.तालुक्यातील कळवंडे धरण दुरुस्तीवरून कळवंडे, कोंढे, शिरळ, पाचाड, मिरजोळी येथील ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले आहेत. धरणाच्या सुरक्षेवरून मंगळवारी ग्रामस्थांची संयुक्त बैठक झाली होती. त्यानंतर बुधवारी आमदार भास्कर जाधव यांच्या पुढाकाराने कळवंडे धरणावर अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीसाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, चिपळूण विभागाचे उपअभियंता विपुल खोत, उद्योजक वसंत उदेग आणि परिसरातील ग्रामस्थ आले होते.यावेळी उद्योजक उदेग यांनीच अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. धरणाच्या दुरुस्तीसाठी वारंवार खर्च केला जातो. मर्जीतील ठेकेदाराला कामे दिली जातात. ही कामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नाही. निविदा प्रक्रियेत ठेकेदाराने कमी दराने काम घेतले आहे. त्यातून निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. धरणात पाणी असेल तरच लोक शेती करू शकतील, अन्यथा पाणीटंचाईमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, याची अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचा इशारा दिला. भास्कर जाधव यांनीही अधिकाऱ्यांना सुनावत दुरुस्तीचे काम दर्जेदार करण्याची सूचना केली. अभियंते जगदीश पाटील व वैशाली नारकर यांनी ग्रामस्थांना धरण सुरक्षिततेची हमी दिली. धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. याशिवाय दुरुस्तीचे काम झाल्यानंतरच धरणात पाणीसाठा केला जाईल. तसेच मशिनरीमुळे जे रस्ते खराब झाले आहेत, त्यांचीही दुरूस्ती करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
मर्जीतील ठेकेदारामुळे कळवंडे धरणाचे काम निकृष्ट, भास्कर जाधवांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 12:38 PM