चिपळूण : ग्रामपंचायतीचे सर्व दफ्तरी कामकाज आॅनलाईन करावे. कामकाज आॅनलाईन करुन पेपरलेस ग्रामपंचायत करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार चिपळूण तालुक्यातील कामथे ग्रामपंचायतीने आपले सर्व कामकाज आॅनलाईन करुन तालुक्यात पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा पहिला मान मिळवला आहे.
या डिजिटल कामकाजाचा ग्रामस्थांना लाभ होणार असून, कमी वेळेत सेवा मिळणार आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता यावी. ग्रामस्थ देशभरात कुठेही वास्तव्यास असले तरी ग्रामपंचायतीच्या आॅनलाईन सेवेचा लाभ त्यांना घेता यावा यासाठी गेल्या काही वर्षापासून कामथे ग्रामपंचायतीत संगणकीकृत कामकाज सुरु आहे.ग्रामपंचायतीचे दफ्तरी कामकाज कमी व्हावे, ग्रामस्थांना त्वरित सेवा मिळाव्यात, दैनंदिन कामकाजात सुसूत्रता यावी, डिजिटल कामकाजातून ग्रामपंचायत पेपरलेस करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींना तशा सूचना दिल्या.
दोन वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून तालुक्यात चर्चेत राहिलेल्या कामथे ग्रामपंचायतीने पेपरलेस कामकाजासाठी तयारी केली. डाटा आॅपरेटर गौरी मालप, ग्रामसेविका अनिता पाटील यांनी ग्रामपंचायतींच्या सर्व नोंदी व अभिलेख आॅनलाईन केले. याकामी सरपंच विजय माटे, उपसरपंच प्रदीप उदेग व सदस्यांनी सहकार्य केले.कर आकारणी, नागरी सेवा, पंचायत नोंदणी पुस्तक, सभा व्यवस्थापन, स्थावर मालमत्ता माहिती, पंचायत लेखांकन, डेड स्टॉक रजिस्टर, संकलित अहवाल आदींच्या नोंदी झाल्या आहेत. वसूल झालेल्या पावत्यांची आॅनलाईन नोंद केल्याने इतर लिखाणकामाची आवश्यकता नाही. ग्रामस्थांना रहिवासी, जन्म व मृत्यू, ८ अ आदी विविध दाखले त्वरित मिळण्यास मदत होईल.