शोभना कांबळेरत्नागिरी : विश्वभूषण, क्रांतिसूर्य, परिवर्तनाचे महामेरू, घटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य अशा असंख्य उपाधींनी गौरविले गेलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला ६६ वर्षे पूर्ण होत आहेत. कापडगाव (ता. जि. रत्नागिरी) येथील समता सैनिक दलाचे सदस्य असलेले या गावातील राजाराम माणका कांबळे यांनी आणलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे जतन या गावातील जनता भक्तिभावाने करीत आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मंजूर केलेल्या निधीतून या गावात भव्य बुद्धविहार आणि बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात आले आहे. त्यात हा चांदीचा अस्थिकलश ठेवण्यात आला आहे.बाबासाहेबांनी कामगारमंत्री असताना कामगारांच्या न्यायासाठी सतत लढा दिला. या चळवळीत गिरणी कामगारांचा सक्रिय सहभाग होता. चळवळीला व्यापक स्वरूप मिळाल्याने यातून समता सैनिक दलाची निर्मिती झाली. यात राजाराम कांबळे यांचाही सहभाग होता. मुंबईतील प्रसिद्ध मफतलाल मिलमध्ये ते कामाला होते. या लढ्याच्या निमित्ताने बाबासाहेबांना जवळून बघण्याचे भाग्य त्यांना लाभले. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व भागातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी दाखल झाले. यात समता सैनिक दलाचे राजाराम कांबळे यांचाही सहभाग होता.बाबासाहेबांच्या अंत्यसंस्कारानंतर राजाराम कांबळे त्यांचा अस्थिकलश आपल्या गावी कापडगाव बाैद्धवाडी येथे घेऊन आले. त्यानंतर त्यांच्या पुढाकाराने वाडीत १ जानेवारी १९५७ साली छोटेसे बुद्धविहार उभारण्यात आले आणि हा अस्थिकलश या विहारात ठेवण्यात आला. कापडगाववासीय या अस्थिकलशाचे दर्शन दररोज घेत आहेत. राजाराम कांबळे यांचे याठिकाणी भव्य विहार उभारण्याचे स्वप्न होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांचेही निधन झाले आहे. मात्र, वाडीतील साऱ्यांच्या एकोप्यामुळे आता त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास आले आहे.कापडगावात असलेल्या या ऐतिहासिक घटनेची दखल घेत सामाजिक न्याय विभागाने २ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर केला. यातून या बुद्धविहाराची आणि बाबासाहेबांच्या स्मारकाची भव्य वास्तू आकाराला आली आहे. यात तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांची प्रतिमा ठेवण्यात आली असून त्यासमोर बाबासाहेबांच्या अस्थींचा चांदीचा कलश ठेवण्यात आला आहे. शेजारी दोन मजल्यांची इमारतही उभारण्यात आली आहे. यात तळमजला आणि पहिल्या मजल्यावर सभागृह तसेच येणारे भिक्खू गण, बौद्ध उपासक यांच्यासाठी विश्रामगृहाची सोय आहे. दुसऱ्या मजल्यावर विविध ग्रंथ आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तके असलेले अद्ययावत वाचनालय उभारण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे.
कापडगाव येथे उभारण्यात आलेल्या बुद्धविहारालगतच्या इमारतीत या ग्रामपंचायतीला वाचनालय सुरू करायचे आहे. त्यासाठी त्यांना प्रस्ताव देण्यास सांगितले आहे. प्रस्ताव आल्यानंतर तो मंजुरीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या बार्टी या स्वायत्त संस्थेकडे पाठविण्यात येईल. - यादव गायकवाड, सहायक आयुक्त, समाजकल्याण, रत्नागिरी