रत्नागिरी : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या कृषी पर्यटन श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट गाव म्हणून दापोली तालुक्यातील कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सरपंच सचिन तोडणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून दरवर्षी पर्यटनातील विविध क्षेत्रांचे पुरस्कार दिले जातात. या स्पर्धेत देशातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९८१ गावे सहभागी झाली होती. यातील आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ३६ गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली. यातील कृषी क्षेत्रासाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नांसाठी कर्दे गावाला हा सन्मान मिळाला आहे.निसर्गसंपन्न आणि मिनी महाबळेश्वर, अशी ओळख असलेल्या दापोली तालुक्यातील अनेक गावांनी आपली स्वतंत्र ओळख जपली आह. कर्दे हे गावही अशीच स्वतंत्र ओळख असलेले आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, पांढरी वाळू आणि नयनरम्य परिसर यामुळे कर्दे गाव पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. कृषी पर्यटन, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठीच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोन बाळगून कर्दे गाव मार्गक्रमण करत आहे. गावाने पर्यावरणीय पर्यटनाला चालना देण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर, जल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे कर्दे गावाची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.जागतिक पर्यटनदिनी शुक्रवार, २७ राेजी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार वितरण झाले. सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड आणि कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गाव कृषी पर्यटनात देशात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 7:21 PM