रत्नागिरी : हापूसच्या नावाखाली कर्नाटकमधील आंब्याची विक्री करण्याला आंबा बागायतदारांनी कडाडून विरोध दर्शवला. बुधवारी सकाळी बागायतदारांनी चक्क स्टिंग आॕपरेशनच करुन अशी विक्री करणाऱ्या लोकांना कडक शब्दात समजावले. त्यामुळे विक्रेते आणि बागायतदारांची बाचाबाचीही झाली.
रत्नागिरीमधील आंबा बागायतदार बुधवारी सकाळी रस्त्यावर उतरले आणि हापूसच्या नावाखाली कर्नाटकच्या आंब्याची विक्री सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशी लोकांची फसवणूक न करण्याची तंबीच त्यांनी विक्रेत्यांना दिली.
कर्नाटकी आंब्याच्या विरोधात स्थानिक बागायतदार आक्रमक झाले आहेत. कर्नाटकचा आंबा हापूस म्हणून विकला जात असल्याने हापूसला दर मिळत नाही. त्यामुळे बागायतदारांनी ही भूमिका घेतली आहे. कर्नाटकचा आंबा विकायचा असेल तर तो त्याच नावाने विका, हापूस म्हणून तो आंबा विकू नका, असे त्यांनी विक्रेत्यांना ठणकावून सांगितले.