रत्नागिरी : फार मोठ्या सांस्कृतिक वारशाचे आपण वारसदार ठरलो आहोत. लोकसहभागातून हा वारसा संरक्षित करण्याची आवश्यकता आहे. उक्षीतील ग्रामस्थांनी लोकसहभागातून कातळशिल्प संरक्षित केली असून, कोकणातील हे प्रथम संरक्षित कातळशिल्प आहे. याची नोंद नक्कीच इतिहासात होईल. रत्नागिरीच्या पर्यटनाला कातळ शिल्पाची जोड असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी केले.उक्षी येथील कातळखोद शिल्प लोकसहभागातून संरक्षित करण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अजय शेडगे, ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक अनिल विभुते, कातळ शिल्पचे संशोधक सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, पुरातत्व विभागाचे समन्वयक ऋत्वीज आपटे, सरपंच मिलिंद खानविलकर उपस्थित होते.कातळशिल्प हा जागतिक दर्जाचा हा ठेवा असून, भविष्यात जागतिक वारसा होऊ शकेल. मानवतेच्या या वारशाचे आपण पाईक आहोत. कातळशिल्पामुळे गावात पर्यटन वाढेल. त्यामुळे रोजगाराची सुविधा उपलब्ध होईल. याशिवाय गावामध्ये पायाभूत सुविधांचा विकास होईल, असेही निवासी उपजिल्हाधिकारी घोरपडे यांनी सांगितले.
उक्षी ग्रामपंचायतीतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच कातळशिल्पासाठी विनामोबदला जागा उपलब्ध करून देणारे जागा मालकांचा गौरव करण्यात आले.कातळशिल्पाचे संशोधक सुधीर रिसबूड यांनी मनोगत व्यक्त करताना लोकसहभागातून संरक्षित करण्यात आलेले कातळशिल्प जगासमोर आणण्यात आले आहे. इसवी सन पूर्व ३५ हजार ते दहा हजार वर्षापूर्वीचे शिल्प असून, जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने हा मोठा ठेवा असल्याचे स्पष्ट केले.
लोकसहभागाशिवाय कोणतेही काम अशक्य आहे, असे ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी मनोगतात सांगितले. जिल्ह्याच्या पर्यटनासाठी सुवर्णसंधी असून, ही तर सुरूवात आहे. भविष्यात पर्यटनासाठी या गावाला नक्कीच उच्च दर्जा प्राप्त होईल, असेही सांगितले.जिल्ह्यात ९५० कातळशिल्पमानवाच्या कलात्मक उत्क्रांतीचा प्राथमिक टप्पा म्हणून या शिल्परचनेकडे पाहिले जाते. इसवी सन पूर्व ३५ हजार ते दहा हजार वर्षांपूर्वीचे शिल्प असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. २० फूट लांब व १६ फूट रूंदीचे हत्तीचे शिल्प कोरण्यात आले आहे. या शिल्पाच्या निकट तसेच शेजारच्या गावातही काही कोरीव कातळ शिल्प आढळली आहेत. प्राचीन कलेचा उत्कृष्ट नमुना या शिल्पाव्दारे लोकांसमोर येत आहे.
जिल्ह्यातील ४३ गावांमधील ७१ ठिकाणी ९५० कातळशिल्प सापडली आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये कातळशिल्पाची भर पडली आहे. उक्षीप्रमाणे संबंधित गावातील ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी कातळशिल्पांचे संवर्धन केले तर नक्कीच पर्यटकांमध्ये आकर्षण निर्माण होईल जगाच्या समोर येतील.