अडरे : राज्य सरकारच्या खावटी अनुदान योजनेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश नव्हता. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून या दोन्ही जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. याप्रकरणी आमदार शेखर निकम यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २,१८१ लाभार्थी योजनेसाठी पात्र ठरले. त्यांना दोन हजारांची रोख रक्कम व २०००चे साहित्य मिळणार आहे. चिपळुणातील पात्र लाभार्थ्यांना आमदार शेखर निकम यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.
राज्य सरकारतर्फे अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणारी खावटी अनुदान योजना जिल्ह्यात बंद होती. सन २०१४पासून या योजनेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश नसल्याने अनुसूचित जमातीमधील ग्रामस्थांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमदार शेखर निकम यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे या योजनेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला.
खावटी अनुदान योजना ही विशेष योजना म्हणून या दोन्ही जिल्ह्यात राबविण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यानुसार या योजनेसाठी जिल्ह्यातील २,१८१ लाभार्थी पात्र ठरले आहेत. चिपळूण तालुक्यातील ५९१ लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पात्र निवडक लाभार्थ्यांना साहित्याचे किट देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सभापती रिया कांबळे, गटनेते राकेश शिंदे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, युवकचे तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे, संजय कदम यांच्यासह कातकरी बांधव उपस्थित होते. तालुक्यातील १,९३१ लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर दोन हजारांची रक्कम जमा केली जाणार आहे, तर १,९०७ साहित्याचे किट प्राप्त झाले आहे.