दापोली : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी संजीवनी सप्ताह दापाेली तालुक्यातील कात्रण, दमामे, तामोंड व भडवळे या गावांमध्ये साजरा करण्यात आला. शेतकरी सहभागातून भात व हळद लागवड प्रात्यक्षिक घेऊन हा कार्यक्रम कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
बीज प्रक्रिया, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खतांचा वापर, विकेल ते पिकेल संकल्पनेवर आधारित काळा भात लागवड, काजू लागवड, हळद लागवड, मग्ररोहयो फळबाग लागवड शेतीशाळा इत्यादी उपक्रम हाती घेण्यात आले. हा उपक्रम प्रात्यक्षिक व मार्गदर्शन स्वरूपात घेण्यात आले. या कार्यक्रमाला मार्गदर्शन वाकवली मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी उमेश मोहिते, फणसू कृषी पर्यवेक्षक चंद्रकांत मोगरे, वाकवली कृषी पर्यवेक्षक प्रकाश कुळे, करंजाली कृषी सहायक चकोर, कृषी सहायक चंदा गावंडे या कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सांगता शेतकरी लक्ष्मी भिकू लोंढे यांच्या शेतावर चारसूत्री भात लागवड करून करण्यात आली. यावेळी कृषी सहायक चंदा गावंडे यांनी चारसूत्री भात लगवड प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.