जे लिहितात, भले तो सोशल मीडियावर नियमीतपणे लिहिणारा असो, वर्तमानपत्रात काॅलम लिहिणारा असो, ज्याची एक-दोन पुस्तके प्रसिद्ध झाली, असा लेखक असो किंवा प्रतिथयश लेखक असो, माझे त्यांच्यासोबत लिखाणामुळे आंतरिक नाते जोडले जाते. माझ्या लेखी हे सर्व लेखकच. यात स्त्री-पुरुष हा भेद नाही. तर अशा लेखकाची ही गोष्ट.
कधीही, कुठेही, चहा पिताना, गाडी चालवताना, काम करताना, कुणाची वेदना बघून, एखादी कल्पना लेखकाच्या मनात एकदम चमकून जाते. हा लखलखीत क्षण असतो. मेंदू खडबडून जागा होतो. त्या कल्पनेवर आपोआपच मनन, चिंतन सुरू होते. खूप सारी विचारप्रक्रिया त्या कल्पनेभोवती विणली जाते. मग, असा क्षण येतो की वाटतं, आता हे सर्व कागदावर उतरायला हवं. तो कागद पेन उचलतो किंवा लॅपटाॅप उघडतो. सगळे विचार जोपर्यंत व्यक्त होत नाहीत, कागदावर उतरत नाहीत, थांबताच येत नाही. कधीकधी लिखाण एकटाकी होते, तर कधीकधी दोन, चार आवृत्त्याही होतात. एकदा लिखाण मनाप्रमाणे झाले की लेखकाला हलके हलके वाटते. मन भरुन प्रेमाने तो त्या लिखाणाकडे बघतो किंवा वाचतो म्हणा ना.
त्यानंतर ते लिखाण आपल्या जवळच्या व्यक्तींना वाचायला दिले जाते. त्यांच्या पसंतीची पावती मिळाली की भरून पावले असे वाटते. पुढच्या लिखाणाला हुरूप येतो. मग सुरू होतो एका लेखकाचा व्यावसायिक प्रवास. आपल्या कविता, लेख, कादंबरी, प्रवास वर्णन छापण्यासाठी लेखक प्रकाशक शोधतो. पुस्तक प्रसिद्ध होते. पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न होतो. तो लेखकाच्या आयुष्यातील सोनेरी क्षण असतो. त्यानंतर पुस्तक विकण्याचा स्ट्रगल सुरु होतो. पुस्तकाचे गठ्ठेच्या गठ्ठे घरी येऊन पडलेले असतात. पुस्तके बेस्टसेलर करण्यासाठी काही तांत्रिक बाबी/ क्लुप्त्या आवश्यक असतात, त्या करायला जमल्या तर काहीच प्रश्न नाही. नावामागे ‘लेखक’ ही बिरुदावली मानाने मिरवायला मिळते. काही लहान- मोठ्या साहित्यिक कार्यक्रमांमध्ये भाषणासाठी, परिसंवादासाठी आमंत्रणे येऊ लागतात. हा प्रवास काही लेखकांचा विनासायास सुरू राहतो. सर्व लेखकांना असा प्रवास जमत नाही. दिलेले लिखाण प्रकाशक छापायला नकार देतात. पुस्तक छापण्याचे स्वप्न भंग पावते. लेखक निराश होतो. ‘लेखक’ या शब्दाचे वलय दूर जात आहे, अशी त्यांना भीती वाटायला लागते. आणि मग... ते लिहिणेच बंद करतात. स्वतःला व्यक्त होण्याचा मार्ग ते स्वतःच अडवून टाकतात. लिहिण्याची प्रेरणा हरवून टाकतात. खूप घुसमट होते त्यांची. मला त्यांना सांगायचे आहे, ‘कृपया असं करू नका. स्वतःबाबत एवढे जजमेंटल होऊ नका. पुस्तके हातोहात विकली गेली, दुसऱ्यांनी कौतुक केले तरच आपण चांगले लेखक’ ही धारणा मनातून काढून टाका. ‘लिहिता येणे’, शब्दात आपल्या भावना, विचार, ज्ञान व्यक्त करता येणे ही मिळालेली एक देणगी आहे. ती देणगी सर्वांना लाभत नाही. त्याबद्दल कृतज्ञता बाळगा आणि लिहित राहा… लिहित राहा …
- डाॅ. मिलिंद दळवी, तळगाव, ता. मालवण.