आबलोली : कोरोनासारख्या महामारीत प्रत्येकाला योगाचे महत्व कळले आहे. या कठीण काळात आत्मबल वाढविण्यासाठी योगा हेच चांगले माध्यम आहे. लोकांच्या मनात योगामुळेच विश्वास वाढला आहे. आपण कोरोनासारख्या महामारीला हरवू शकतो. योगाचं महत्व ओळखून प्रत्येकाने योगा करून स्वत:ला तंदुरुस्त ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या गुहागर तालुका समतादूत शीतल पाटील यांनी केले.
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा, आबलोली नं. १ येथे योगदिनाच्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया गुहागरकर, शिक्षक संतोष मुंडेकर यांनी उपस्थितांना योगाचे प्रशिक्षण दिले. यावेळी अंगणवाडी सेविका प्रिया कदम, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी सामाजिक अंतर राखून उपस्थित होते. संतोष मुंडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.