मेहरून नाकाडे रत्नागिरी : शाळेची वेळ सोडली तर बहुतांश मुले ही फावल्या वेळेत मोबाईलमध्येच रमतात. अशावेळी या मुलांना खाण्या-पिण्याचेही भान राहात नाही. हल्ली तर मैदानावर प्रत्यक्ष खेळण्याऐवजी मोबाईलवर गेम खेळायला त्यांना आवडते. परंतु निगुंडळ (ता. गुहागर) येथील मुलांनी चक्क मोबाईल बाजूला ठेवून प्रत्यक्ष रोटरी टिलर चालविण्याचा आनंद घेतला. भात लागवडीपूर्वी नांगरणी कशी करावी, यांत्रिक नांगरणीमुळे वेळ कसा वाचतो, याचा अनुभव त्यांनी घेतला. त्यासाठी त्यांना गजेंद्र पौनिकर यांनी प्रोत्साहित करून शेतीतील काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या.निगुंडळ येथे मुकनाक यांच्या शेतात भात लावण्यासाठी ह्यरोटरी टिलरह्णने नांगरणी सुरु असताना, शुभम व तुषार शिरकर, मयूर व मयुरी नाणीस्कर, तन्वी मुकनाक ही मुले अचानक शेतात आली. शेताच्या बांधावर उभी राहून ती नांगरणी कशी होते, हे पाहत होती. त्यांची उत्सुकता वाढली आणि बांधावरून उतरून रोटरी टिलरसोबत पौनिकर यांच्याबरोबर शेतभर फिरू लागली.
दोन राऊंड झाल्यानंतर..अरे एका जागी बसा..थांबा..पाय दुखतील, असे पौनिकर यांनी सांगितले. त्यावर नाही काका..आम्हाला चालवायला द्याल का? अशी विचारणा केली. यावर त्यांना थांबा थोडं सांगून सुरक्षित व मोकळ्या जागेत टिलर आल्यानंतर यातील एका मुलाच्या हातात त्यांनी टिलर दिला. अर्थात पौनिकर सोबत होतेच.
क्लच दाबून ठेवला की टिलर सुरु..हे न सांगताच या मुलांनी निरीक्षणातून अनुभवलं. टिलर चालवताना तो कशा पध्दतीने फिरवावा, याचंही निरीक्षण मुलांनी केलं होतं. प्रत्येकाने एक-एक राऊंड टिलर चालविण्याचा आनंद घेतला. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. मुलं-मुली प्रत्यक्ष टिलर चालविण्यात रममाण झाली होती. त्याचवेळी टिलरची किंमत, त्याचा वापर, कुठे खरेदी करावा, त्याची वॉरंटी याबाबत जेवढे प्रश्न होते, ते त्यांनी पौनिकर यांना विचारले. त्यातील एका मुलाने तर घरी जाऊन आजीला सांगितलं, ह्यमी टिलर चालवला..आपणही पुढच्या वर्षी असा टिलर घेऊया.लहान मुलांना रोटरी टिलर चालवायला शिकवताना, प्रत्यक्ष त्यांच्या हातात तो देताना पौनिकरांनी कोणताही किंतु परंतु न ठेवता, मोकळेपणाने हो म्हटले. त्यामुळे रोटरी टिलर चालविण्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.प्रत्यक्ष नांगरणीचा घेतला अनुभवभात लागवडीपूर्वी नांगरणी महत्त्वपूर्ण आहे. पारंपरिक नांगरणीपेक्षा रोटरी टिलरच्या सहाय्याने नांगरणी कमी श्रमात, कमी वेळेत होते, या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव लहान मुलांनी घेतला. निगुंडळ येथील मुलांनी रोटरी टिलर चालविण्याबरोबरच बालसुलभ बुद्धीने टिलरबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसनही करून घेतले.शेतीसाठी मजुरांची कमतरताशेतीसाठी मजुरांची कमतरता हा मोठा प्रश्न आहे. मजुरांअभावी मोठी शेतजमीन पडीक बनली आहे. भातशेती सोडून काहींनी फळबाग लागवड केली आहे. शेतीसाठी प्रोत्साहित करण्याकरिता शासन विविध योजना राबवित आहे. याचवेळी शेतीबाबत लहान मुलांमध्ये असलेल्या उत्सुकतेमुळे शेतीला नक्कीच चांगले दिवस येतील.उत्सुकता वाढतेमुलांनी एखादी गोष्ट मागितली की, प्रथम त्यांना दटावले जाते. त्यापेक्षा त्यांना त्या गोष्टीचा अनुभव घेण्यापासून परावृत्त न केल्यास नक्कीच त्यांची उत्सुकता वाढते. मोबाईलचे वेड कमी करण्यासाठी पालकांनी स्वत: काम करीत असताना मुलांना बरोबर ठेवले, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली तर नक्कीच याचा आनंद मिळेल.