रत्नागिरी : येथील मल्याळी संघटनेने रत्नागिरीकरांना आवाहन करताच शहरातील व्यापाऱ्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करून तब्बल पाच टन धान्य, ५०० किलो आटा आणि इतर विविध वस्तू अवघ्या दोन दिवसांत जमवून ही सर्व मदत केरळला रवानाही केली. केरळमधील आलपी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या सर्व वस्तू वितरणाकरिता सुपूर्द करण्यात येणार आहेत.केरळमधील महापुराने या राज्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत केले आहे. अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या कष्टप्रद अवस्थेत दिवस कंठावे लागत आहेत. पुरात सर्व काही वाहून गेल्याने या लोकांच्या खाण्या-पिण्याची, कपडालत्ता तसेच राहण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या राज्याला सर्वांच्याच तातडीच्या मदतीची गरज आहे.याच भावनेतून रत्नागिरीत उद्योग, व्यवसाय तसेच नोकरीनिमित्त वास्तव्याला असलेल्या केरळी बांधवांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी रत्नागिरीकरांना मदतीचे आवाहन करताच रत्नागिरीकरांनी आपले दातृत्व दाखवत आर्थिक मदतीचा हात पुढे केला. विशेषत: रत्नागिरीतील व्यापारी मंडळींनीही सढळ हाताने धान्य तसेच इतर वस्तुंची मदत केली आहे. अवघ्या दोन चार दिवसात ही मदत जमा झाली आहे.येथील केरळी बांधवांनी मल्याळी संघटना स्थापन केली आहे. यात मोहन नायर, सुरेश नायर, अजित पुन्नकलेकर, बाबू नायर, रॉय एलियात, प्रवीण यांचा समावेश आहे.
ही संघटना तसेच रत्नागिरीतील नागरिक आणि येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन केलेल्या या मदतीमुळे साडेतीन टन तांदूळ, एक टन गहू, ५०० किलो आटा (पीठ) याचबरोबर विविध प्रकारचे बेकरी पदार्थ, सॅनिटरी नॅपकीन, कपडे, विविध प्रकारची औषधे, डाळ, तेल, तसेच घरगुती साहित्य मोठ्या प्रमाणावर जमा झाले आहे.पाच टन धान्य आणि इतर वस्तुंनी भरलेला स्वतंत्र ट्रक गुरूवारी सायंकाळी केरळकडे रवाना झाला आहे. तिथे पोहोचल्यानंतर आलपी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या वस्तु सुपूर्द करण्यात येणार आहेत. त्यानंतर या वस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे. मल्याळी सेवा संघाने आवाहन करताच रत्नागिरीकर केरळवासियांच्या मदतीला धावून गेले. त्यामुळेच एवढी मदत गोळा झाली, याबद्दल या संघटनेने रत्नागिरीकरांना धन्यवाद दिले आहेत.एकात्मतेचे दर्शन...प्रत्येकालाच आपल्या भाषेचा, गावाचा, प्रांताचा, राज्याचा अभिमान असतो. यातून अनेकदा वादही निर्माण होतात. मात्र, जेव्हा आपत्ती येते, तेव्हा आपण मदतीला धावून जायला हवे, ही मानवतावादाची भावना प्रत्येकात निर्माण होते. केरळ राज्यावर आलेल्या आलेल्या या नैसर्गिक आपत्तीवेळी इतर राज्यांबरोबरच महाराष्ट्रानेही मदतीसाठी धाव घेतली आहे. रत्नागिरीकरांनीही मनापासून सर्व प्रकारच्या मदतीचा हात पुढे करत देशाच्या एकात्मतेचे दर्शन घडविले.