दापोली : चातुवर्ण्य व्यवस्थेचा पगडा असणाऱ्या काळात ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, ना मी एक पंथाचा, तेच पतित की, जे आखडती प्रदेश साकल्याचा, अशी वैचारिक क्रांतीची काव्यसुमने लिहिणऱ्या कृष्णाजी केशव दामले ऊर्फ कवी केशवसुत यांचे वळणे (ता. दापोली) येथील घर सध्या भग्नावस्थेत आहे. केशवसुतांना ज्याठिकाणी काव्यसंपदा स्फुरली, त्या वळणे गावात केशवसुतांची स्मृती कायम राहण्यासाठी या घराची दुरुस्ती करून त्याचे जतन करावे, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.विषय आणि अभिव्यक्ती या सर्वार्थाने आधुनिक कवितेचे जनक ठरलेल्या कवी केशवसुतांचे दापोली तालुक्यात दाभोळ मार्गावर वळणे हे गाव आहे. केशवसुतांच्या काव्यप्रतिभेची खरी सुरुवात याच वळणे गावातून झाली. केशवसुतांचे जन्मगाव हे रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड असले तरी दापोली येथील वळणे येथे काहीकाळ त्यांचे वास्तव्य होते.
निसर्गरम्य वळणे गावातून शांतपणे वाहणारी नदी, तेथील केवड्याचे बन, नारळी, पोफळी, आंबा, काजू आणि विविध प्रकारच्या झाडांनी नटलेल्या रम्य परिसराने केशवसुतांच्या मनातील काव्यप्रतिभा जागृत होऊन कवितांनी आकार घेतला. या काव्यांचा सुगंध सर्वदूर दरवळला. मात्र, केशवसुतांचे वास्तव्य असलेले वळणे गावातील हे घर सध्या भग्नावस्थेत असून, सद्यस्थितीत घराच्या पडलेल्या भिंती व घराच्या जोत्याचे अवशेषच फक्त शिल्लक राहिले आहेत.
वळणे येथील केशवसुतांच्या घराच्या दुरुस्तीबाबत कवी मधुमंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष असताना प्रयत्न केले होते. मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आजच्या घडीला याठिकाणी फक्त आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत.
दापोलीमध्ये येणाऱ्या साहित्यप्रेमी पर्यटकांना आद्यकवी केशवसुत यांचे वळणे गावातील घर पाहण्याची इच्छा असते. मात्र, दुर्दैवाने आज हे घर जमीनदोस्त झाल्यामुळे पर्यटकांची घोर निराशा होते.
स्मृती जपणे गरजेचेमालगुंड या केशवसुतांच्या जन्मगावी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रयत्नाने कवी केशवसुतांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी आणि नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी एक वेगळेपण असलेले स्मारक उभारण्यात आले आहे. मराठी साहित्य अजरामर केलेल्या तुतारीकार केशवसुतांच्या स्मृती जपण्यासाठी वळणे (ता. दापोली) येथील भग्नावस्थेत असलेले केशवसुतांचे घर दुरुस्त करून स्मारक उभारल्यास साहित्यप्रेमी पर्यटकांना एक नवे दालन खुले होईल.- प्रशांत परांजपे,केंद्रीय कार्यवाह, कोमसाप.