खेड : तालुक्यातील खोपी - शिरगावचा शिमगोत्सव सातगाव भोसले परिवारात एक वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सव म्हणून ओळखला जातो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गावातील मोजक्याच प्रमुख ग्रामस्थ, मानकरी, पुजारी यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून शांततेत व साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला.
याठिकाणचे रघुवीर, रामवरदायिनी, झोलाई - मानाई मंदिर एक जागृत देवस्थान असून, शिरगाव, खोपी, कुंभाड, मिर्ले, बिजघर, तिसंगी, कुळवंडी या गावातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान मानले जाते. येथील सार्वजनिक होलिकोत्सवाला दरवर्षी प्रचंड गर्दी उसळत असते. विशेष म्हणजे शिमगोत्सवात खेड तालुक्यातील संवेदनशील गावामध्ये शिरगावचादेखील समावेश असल्याने यंदा ग्रामस्थांनी उत्सवादरम्यान शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली होती.
होम लागल्यानंतर ग्रामदेवतेची पालखी सहाणेवर विराजमान झाली असताना शिरगाव भोसलेवाडीचे ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते, मुंबईकर चाकरमानी सुरेश भोसले यांनी पालखीचे दर्शन घेतले. हातभेटीचा नारळ, श्रीफळ, पालखी स्पर्श मान देऊन ग्रामदेवतेच्या मंदिरात अर्पण केला. यावेळी गावाच्या विकासासाठी कोरोना तसेच इतर संसर्गजन्य रोगराईपासून संरक्षण करावे, यासाठी घालण्यात आले. ग्रामस्थांतर्फे ग्रामदेवतेला साकडे घालण्यात आले.