मनीष दळवीअसुर्डे : एका कुटुंबासाठी १०-१५ वीजखांब टाकून जंगलातून वीज घ्यायची म्हटले तर गरिबाने एवढा पैसा कुठून आणावा? त्यामुळे आपण असेपर्यंत वीज मिळणे हे माझे दिवा स्वप्न होते. माझ्या डोंगरदऱ्यातील घरात वीज येऊन घर उजळेल, हे मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते, हे उद्गार आहेत चिपळूण तालुक्यातील कामथे धनगरवाडीतील रहिवासी यशवंत बाबाजी खरात यांचे.यशवंत खरात हे ५ वर्षांपूर्वी दहीवली गावातील मूकनाकवाडी येथे डोंगरपायथ्याशी कुटुंबासह स्थलांतरित झाले. दूध विकणे हेच त्यांचे उदरनिर्वाहचे साधन. गेली पाच वर्षे मूलभूत सुविधाही त्यांना मिळत नव्हत्या. रस्ता, वीज, पाणी यापासून वंचित असलेले हे कुटुंब वीज पुरवठा घेण्यासाठी जवळपास १ किलाेमीटरपर्यंत वाहिनी नाही. घरात ८ माणसांचे कुटुंब केवळ दुधाच्या धंद्यावर चालवायचे. अशातच खरात यांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला आणि त्यांचे चालणे-फिरणे बंद झाले. त्यांची परिस्थिती जाणून सावर्डे येथे डॉ. अजय पाटील व डॉ. विजय पाटील हे त्यांच्यावर उपचार करण्याकरिता रात्री अपरात्री त्यांच्याकडे जात असत.खरात यांचे घरी वीज नसल्याचे डॉक्टर बंधूंनी महावितरणचे अशोक काजरोळकर यांना सांगितले. त्यांनी खरात यांचा वीज मागणी अर्ज घेऊन महावितरणचे उपव्यवस्थापक अशोक काजरोळकर यांनी सावर्डे शाखाधिकारी यांना प्रकरण मंजुरीकरिता पाठविण्यास सांगितले. घाडगे यांनी जंगलातून सर्वेक्षण करून हे प्रकरण मंजुरीकरिता सादर केले. तर कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी त्वरित मंजुरी देऊन ठेकेदाराची नेमणूक केली. जागा मालकांच्या सहकार्याने ठेकेदार प्रतीक कोल्हापुरे यांनी काम पूर्ण केले. त्यानंतर दि. १८ मार्च रोजी कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी खरात यांच्या घरी भेट देऊन वीज पुरवठा सुरू केला.घरात वीज आल्याचे पाहून यशवंत खरात आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या डाेळ्यांत पाणी आले. त्यांनी उपव्यवस्थापक अशोक काजरोळकर, सहायक अभियंता कमलेश घाडगे, उपकार्यकारी अभियंता शरद परीट, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हर्षितकुमार वाकोडे, कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांच्या कामाचे काैतुक करून आभार मानले.
हे आमचे कर्तव्य असून आपणास यापुढेही अशीच सेवा देण्यात येईल. घर तिथे वीज देण्याचे धोरण कंपनीचे असल्याने विजेविना असणाऱ्या नवीन ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. - कैलास लवेकर कार्यकारी अभियंता, चिपळूण.