खेड : नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या दालनाच्या सुशोभिकरण कामाला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ खेडेकर यांनी सोमवारी नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच आपला कारभार सुरू केला आहे.
नगराध्यक्षांचे नवे दालन ही आपली वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. यापुढील नगराध्यक्षांनाही त्याचा उपयोग होणार आहे. याबाबत आक्षेप घेणे दुर्दैवी असून, प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप यावेळी पत्रकारांशी बोलताना खेडेकर यांनी केला.नगराध्यक्षांचे दालन नूतनीकरण कामाचा वाद विकोपाला गेला असून, गुरुवार, १९ डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीकडे खेडवासियांचे लक्ष लागले आहे. आपत्कालिन परिस्थितीत वापरावयाचे कलम ५८/२ चा दुरूपयोग करत २२ लाख ५६ हजार १७५ रुपये खर्च करून नगराध्यक्ष खेडेकर यांनी नवे दालन उभारण्याचा घाट घातला असल्याचा आक्षेप बांधकाम सभापती नम्रता वडके यांनी घेतला होता.
नगराध्यक्ष खेडेकर नागरिकांकडून मिळालेल्या कररूपी पैशांचा अपव्यय करत असल्याचा आरोप करत याप्रकरणी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. नव्या दालनाच्या कामाला व सुशोभिकरणाला स्थगिती देण्याची मागणी केली होती.यानंतर संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावून नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व तक्रारदार यांचे म्हणणे मागवत १९ डिसेंबरपर्यंत कामाला स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष खेडेकर यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध करत सोमवार, १६ डिसेंबरपासून नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच नवे दालन थाटले आहे.
शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यानजीक नव्या दालनाचा शुभारंभ करत आपल्या प्रशासकीय कामकाजाला सुरूवात केली. लगतच्या भिंतीवर नगराध्यक्षांची केबिन असा फलकही लावण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी दैनंदिन कामकाजासाठी नगरपरिषदेत आलेल्या नागरिकांना नगराध्यक्ष खेडेकर थेट मुख्य प्रवेशद्वारासमोरच बसल्याचे पाहून आश्चर्याचा धक्का बसला.
सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारा आणि जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता आहे. यामुळे आपल्याला दालनाची अजिबात आवश्यकता नाही. यापुढे शिवाजी महाराजांच्या साक्षीने प्रवेशद्वारावरच कारभार करणार आहे.- वैभव खेडेकरनगराध्यक्ष, खेड नगर परिषद