खेड : लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील वैद्यकीय सेवा देणारी आस्थापने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस पथकाकडून मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला.
शहरातील महाड नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, हुतात्मा अनंत कान्हेरे चौक, दापोली नाका, चिपळूण नाका, रेल्वे स्थानक व महामार्गावर भरणे नाका या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी जागोजागी अटकाव करण्यात येत आहे. मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाट, तुळशी विन्हेरे मार्गावर नातूनगर तसेच परशुराम घाट येथे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याची हद्द असणाऱ्या कशेडी घाट व तुळशी विन्हेरे मार्गावर नातूनगर येथे विना ई पास प्रवेश करू पाहणाऱ्या वाहनांना प्रवाशांसहित माघारी पाठविण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या निर्बंधाना शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसत आहे. बाजारपेठेसह बसस्थानकातही शुकशुकाट दिसून येत होता.
कोरोना साखळी तोडण्यासाठी बसस्थानकाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असताना खेड बसस्थानकातून गुरुवारी सकाळी ६ वाजता चिपळूण, ८.२० वाजता रत्नागिरी व ८.३० वाजता दापोली तर सायंकाळी ५.१५ वाजता दापोली मार्गावर बस सोडण्यात आल्या. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व पोस्टाचे टपाल आदी सेवेसाठी या गाड्या सोडण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. शासकीय कार्यालये, बँका आदी ठिकाणीही कडक निर्बंधांमुळे किरकोळ अपवाद वगळता शांतता होती.
-----------------------------
खेड शहरात लाॅकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. (छाया : हर्षल शिराेडकर)