लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाबाधित मृतांवर येथील जगबुडी नदीजवळील स्मशानभूमीत नगरपरिषदेतर्फे अंत्यसंस्कार करण्यात येतात. कोरोनाबळींच्या वाढत्या संख्येने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या विशेष निधीतून अत्याधुनिक विद्युत दाहिनी मंजूर झाली आहे. लवकरच ही विद्युत दाहिनी स्मशानभूमीत बसवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिली.
तालुक्यात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच कोरोनाबळींची संख्याही झपाट्याने वाढत आहे. गेल्या दीड महिन्यात तब्बल ५२ कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार
करण्यात आले. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील ८ कर्मचारी अंत्यसंस्कारांचे सोपस्कार पार पाडत आहेत. दिवसाला दोन ते तीन प्रसंगी पाच मृतदेहांवरही अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
कोरोना मृतांच्या वाढत्या संख्येमुळे स्मशानभूमीतील जळाऊ लाकडांचा साठाही वाढवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे स्मशानभूमीतील परिस्थितीची माहिती घेतली. यादरम्यान, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी विद्युत दाहिनी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केली. याची जिल्हाधिकारी मिश्रा यांनी तातडीने
दखल घेत विशेष निधीतून अत्याधुनिक विद्युत दाहिनी मंजूर करून दिली.