खेड : तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने ‘एक गाव, एक अधिकारी’ योजना सुरू केली आहे़ त्या अंतर्गत खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी शशीकिरण काशीद व पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी अलसुरे व कोंडिवली गावाचे पालकत्व स्वीकारले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ़ मोहितकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
पालकत्व स्वीकारलेल्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जातीने लक्ष घालून यासाठी ग्रामस्थांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती, प्रबोधन करून ग्रामस्थांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच गावातील लसीकरण मोहीम, वैद्यकीय तपासणी व औषधोपचार याबाबत मदत केली जात आहे.
यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तंटामुक्त समिती अध्यक्ष, ग्रामकृती दल अध्यक्ष यांची समिती नेमून गावात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चाकरमानी किंवा गावाबाहेरच्या मंडळींना गावात येत असल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गृह अलगीकरण किंवा क्वारंटाईन करणे आदी बाबींची पूर्तता करून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
ग्रामस्थांचे पालक म्हणून आम्ही जबाबदारी घेतली आहे. याकामी आम्ही कुठेच कमी पडणार नाही. फक्त ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. आपल्या तब्येतीला जपावे, विनाकारण घराबाहेर न पडता स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद यांनी केले.