खेड : येथील पंचायत समितीच्या सेस फंडातून शेतकऱ्यांना ७० टक्के अनुदानावर हळदीचे बियाणे पुरविण्यात येणार आहे. तालुक्यातील हळद लागवडीचे प्रमाण वाढवण्यासाठी अनुदानावर हळद बियाणे पंचायत समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती सभापती मानसी जगदाळे यांनी दिली.
आमदार योगेश कदम यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टीने सक्षम बनविण्यासाठी दापोली मतदारसंघात जास्तीत जास्त प्रमाणात हळद लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडील विहित अर्ज, आधारकार्डची व बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स व सात बाराची मूळ प्रत जोडून कृषी विभागाकडे अर्ज दाखल करावा. एका सातबाऱ्यावर जास्तीत जास्त ५० किलो बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बियाणे ताब्यात घेताना प्रति किलो ६० रुपये या दराने होणारी रक्कम जमा करावयाची असून प्रति किलो ४२ रुपयांचे अनुदान सुमारे ३० ते ३५ दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. तालुक्यातील हळद लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे.