खेड : नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या दालनाच्या नूतनीकरणाच्या कामावरून सुरू झालेल्या वादाची कोंडी अखेर फुटली आहे. बांधकाम सभापती नम्रता वडके यांनी दालनाच्या नूतनीकरण व सुशोभिकरणावर घेतलेला आक्षेप जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी फेटाळून लावला. यामुळे नगरपरिषदेत सुरू असलेल्या केबिन नाट्यावर पडदा पडला आहे.नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना नगर परिषद अधिनियमातील कलम ५८ नुसार आकस्मिक खर्च करण्याचा पूर्ण अधिकार आहे. नगराध्यक्षांच्या ५८ खालील विशेष अधिकाराला ३०८ खाली आव्हान देता येणार नाही. स्थायी समितीचा ठराव असेल तर अशी कारवाई करता येते, असा युक्तिवाद वैभव खेडेकर यांच्यातर्फे अॅड. जी. एन. गवाणकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर केला.
नम्रता वडके यांनी स्वत: जिल्हाधिकारी यांच्यापुढे आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर जिल्हाधिकारी यांनी खेडेकर यांचा निर्णय योग्य असल्याचा निर्णय दिला. खेडेकर यांच्या नगरपालिकेतील दालनात पावसामुळे गळती होत होती. पाण्यामुळे भिंतीला शॉक येण्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे खेडेकर यांनी विशेषाधिकार वापरून दालनाच्या नूतनीकरण सुरू केले. त्याला नम्रता वडके यांनी आक्षेप घेतला.प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी तक्रारीवर झालेल्या सुनावणीचा निकाल राखून ठेवल्याने वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ सलग ८ दिवस मुख्य प्रवेशद्वाराजवळच बसून कामकाज केले होते. आता आक्षेप फेटाळला गेल्याने नव्या दालनाच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. या निर्णयामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
या निर्णयामुळे मी समाधानी असून, जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाचे स्वागत करतो. बांधकाम सभापतींच्या वैयक्तिक द्वेषापोटी नगरपरिषद प्रशासन जवळपास एक महिना ठप्प झाले होते. मात्र, यापुढे शहरात विकासकामे सुरू होतील.- वैभव खेडेकर, नगराध्यक्ष