जनतेच्या सोयीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे सुरू आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या कामाचा बोजवारा उडाला. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा तडाखा लोकांना बसला आहे. १० ते १५ दिवस मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. देवघर-घेरारसाळगड रस्ता तसेच शिरगाव, तिसंगी रस्त्यावर मोठ्या दरडी येऊन मार्ग बंद झाला होता. भूस्खलनाने रस्त्याला भेगा पडल्याने एसटी सेवाही बंद झाली होती. पावसाळ्याच्या दिवसांसह कोरोनाची महामारी व अन्य आजारही वाढल्याने ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सोयी-सुविधांसाठी दळणवळणाचे साधन राहिले नसल्याने ग्रामस्थांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांची कामे रखडल्याने ग्रामस्थांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अधिकारी व ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसत असून, प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेतल्यास आंदोलन छेडण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत.
-----------------------
खेड तालुक्यातील खोपी, शिरगाव, देवघर, घेरारसाळगड, तिसंगी या रस्त्यांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे.
- योगेश कदम, आमदार