गुहागर : तालुक्यातील खोडदे येथील मुुंबईस्थित रेश्मा रवींद्र सावंत यांच्या घरातील एक लाख ३६ हजार ६०० रुपयांची चोरी झाल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. त्यांच्या सासूबाई सरस्वती सावंत यांच्यासह काही दिवसांपासून रेश्मा सावंत या गावी राहत होत्या.
रस्ते बंद
रत्नागिरी : नजीकच्या शिरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रमुख मार्ग भूमिगत विद्युतवाहिन्यांसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे सर्व माती रस्त्यावर आल्याने हे मार्ग बंद झाले आहेत. अतिवृष्टीमुळे खड्ड्यातील माती थेट रस्त्यावर आली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना अडचणीचे झाले आहे.
आरोग्य केंद्राची दुरवस्था
खेड : तालुक्यातील ग्रामीण भागातील वावे प्राथमिक आरोग्य केंद्राची सध्या दुरवस्था झाली आहे. या केंद्राच्या दुरुस्तीसाठी ११ लाख ४० हजार रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, आरोग्य केंद्राची अवस्था दयनीय झाली असल्याने संबंधित ठेकेदाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
वृद्ध बेपत्ता
राजापूर : तालुक्यातील वालये येथील ७५ वर्षीय प्रभाकर संभाजी तावडे हे ११ मेपासून बेपत्ता आहेत. ते गावी एकटेच राहत होते. त्यांची मुले मुंबईला नोकरीनिमित्त वास्तव्याला आहेत. ११ मे रोजी सकाळी ७ च्या सुमारास ते घरातून बाहेर पडले असून अद्याप घरी न परतल्याने येथील पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
हार्डवेअरची दुकाने सुरू
देवरूख : घरे, गोठे, इमारती आदींच्या दुुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या खरेदीसाठी हार्डवेअरची दुकाने आता सुरू ठेवण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील जनतेला लोखंड, सिमेंट पत्रे, ताडपत्री, चुका, खिळे, प्लॅस्टिक कागद आदी वस्तू खरेदी करता येणार आहेत.
जिल्ह्याला दिलासा
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०० ते ४०० च्या दरम्यान येऊ लागली आहे. एप्रिल महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत भरमसाट वाढ झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा घायकुतीस आली होती. परंतु, गेल्या ५-६ दिवसांपासून ही संख्या थोडीशी कमी झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळत आहे.
इंधनाची दरवाढ
खेड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असल्याने सुरू झालेले लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य जनता हतबल झालेली आहे. महागाईचा भस्मासुर वाढतच आहे. अशातच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात प्रचंड वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
कच-याचे साम्राज्य
रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात पुन्हा कच-याचे साम्राज्य वाढले आहे. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी या रुग्णालयात ये-जा करणा-या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
वादळाने नुकसान
गणपतीपुळे : रविवारी रत्नागिरीच्या किनारपट्टीवर धडकलेल्या तोक्ते चक्रीवादळाने समुद्रकिनारी वसलेल्या गावांना चांगलाच तडाखा दिला आहे. काही घरांवर झाडे कोसळल्याने घरांची कौले बाद झाली आहेत. तसेच नारळाच्या झावळ्यांनीही अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे त्वरित व्हावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पूल सुरू करण्याची मागणी
देवरूख : रत्नागिरी-देवरूख मार्गाचे काम सध्या सुरू आहे. रविवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे सध्या या रस्त्याची दैना झाली आहे. या मार्गावरील पांगरी येथील पर्यायी पूल सध्या धोकादायक बनला आहे. मुख्य मार्गावरील पुलाचे काम सुरू असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.