लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : गुहागर - विजापूर रस्ता रुंदीकरणात मार्गताम्हाणे खुर्द-उमरोलीला जोडणारा नदीवरील पूल सध्या चर्चेत आला आहे. या पुलाचे बांधकाम नदीचा मूळ प्रवाह बदलून उभारण्यात आल्याने दोन्ही बाजूंच्या वस्त्यांमध्ये पावसाळ्यात पुराचे पाणी घुसण्याची दाट शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन येथील ग्रामस्थांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी पुलाच्या दोनही बाजूने संरक्षक भिंती उभारण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
मार्गताम्हाणे खुर्द सुतारवाडीजवळ उमरोली गावाच्या हद्दीच्या नदीवरील या पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप दोन्ही बाजूकडील रस्ते झाले नसल्याने पुलावरून वाहतूक सुरू झालेली नाही. रस्ता रुंदीकरणात येथील जुना पूल तोडण्यात येऊन त्याच जागेवर नव्या पुलाची उभारणी न करता थोडा पुढे सरकवून नव्याने बांधण्यात आला. जुन्या पुलाला धरून नदीचा मूळ प्रवाह होता. तो आता नव्या पुलामुळे बदललेला दिसत आहे.
जुना पूल असताना नदीच्या दोन्ही बाजूने पक्क्या दगडाच्या भिंती होत्या. त्यामुळे नदीच्या दोनही बाजूने असणाऱ्या वस्त्यांमध्ये पावसाळ्यात पाणी घुसण्याचे प्रकार नव्हते. मात्र, आता नव्या पुलामुळे नदीचा प्रवाह एका बाजूला, तर पूल दुसऱ्या बाजूला असा उलटा प्रकार दिसत आहे. या पुलाला धरून नदीच्या दोन्ही बाजूने संरक्षक कठडे किंवा भिंती न बांधल्यास पावसाळ्यात नदीला पूर येऊन त्याचे पाणी उमरोली हद्दीतील वस्त्यांमध्ये अधिक प्रमाणात घुसणार आहे. तसेच शेतीचेही मोठे नुकसान होणार आहे.
दरम्यान, या सर्व परिस्थितीची दोनही गावच्या ग्रामस्थांना जाणीव झाल्याने त्यांनी पुलाच्या ठिकाणी अधिकारी व ठेकेदाराला बोलावून येथील झालेल्या कामाचा जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंती घालून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी उपसरपंच गजानन कोतवडेकर, स्वप्निल मुंढेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------------------------
गुहागर - विजापूर रस्ता रुंदीकरणात मार्गताम्हाणे खुर्द-उमरोलीला जोडणारा नदीवरील पूल नव्याने उभारला जात आहे.