रत्नागिरी : रत्नागिरीतील एका बंगल्यात सुमारे ३० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सुरतमधील व्यावसायिकाचे अपहरण करून ठेवणाऱ्या बिहारच्या कुख्यात चंदनसोनार टोळीतील सातजणांच्या गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या. ही कारवाई सोमवार, २९ मार्च रोजी रत्नागिरीत करण्यात आली. मात्र, याबाबतची काेणतीच माहिती स्थानिक पाेलिसांना न देता अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली.
जितू पटेल (रा. उमरगाम, गुजरात) असे अपहरण करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. यात पप्पू चौधरी, दीपक ऊर्फ अरविंद यादव, अजमल हुसेन अन्सारी, अयाज, मोबीन ऊर्फ टकल्या, इशाक मुजावर, जिज्ञेशकुमार ऊर्फ बबलूकुमार यादव अशी अटक करण्यात आलेल्या चंदनसोनार टोळीतील सातजणांची नावे आहेत. पटेल यांचा उमरगाम येथे मोठा व्यवसाय आहे. २२ मार्च रोजी ते आपल्या मित्रांना भेटून परतत असताना चंदनसोनार टोळीने त्यांच्या गाडीला धडक देऊन त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांच्याकडे ३० कोटींची खंडणी मागितली होती. याबाबत त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.
त्यानंतर उमरगाम पोलिसांसह गुजरात एटीएस, सुरत शहर पोलीस, गुन्हे शाखा आणि महाराष्ट्रातील मीरा भाईंदर वलसाड पोलिसांनी संयुक्तपणे टीम तयार करून तपासाला सुरुवात केली, तर चंदनसोनार टोळीने जितू पटेल यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना प्रथम वलसाड येथे नेले. त्यानंतर त्यांना रत्नागिरीतील एका बंगल्यात डांबून ठेवण्यात आले होते. याबाबत पोलिसांच्या टीमला माहिती मिळताच त्यांनी जितू पटेल यांची त्या बंगल्यातून सुटका करत सातजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दोन कारही जप्त करण्यात आल्या आहेत.
चाैकट
‘ताे’ बंगला काेणाचा
सुरत येथून अपहरण करून आणलेल्या व्यावसायिकाला रत्नागिरीतील एका बंगल्यात ठेवण्यात आले हाेते. हा बंगला नेमका काेणाचा आहे, याचा शाेध सुरू आहे. तसेच या बंगल्याची माहिती या टाेळीला कशी मिळाली, त्यांनी त्याच बंगल्याचा आधार का घेतला या प्रश्नांची उत्तरे शाेधण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणात रत्नागिरीतील काेणी स्थानिकाने मदत केली आहे का, याचाही शाेध घेण्यात येणार आहे.