चिपळूण : बाजारपेठेतील ओतारी गल्लीतील एका परप्रांतीय सोन्याच्या दागिन्यांची कारागिरी करणाऱ्यास आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत तीन तोतया अधिकाऱ्यांनी दीड कोटीच्या ऐवजासह अपहरण केले. याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात तिघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या तिघांनाही पुणे येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.बाजारपेठेतील सोनारांचे दागिने बनवण्याचे काम संबंधित कारागीर अनेक वर्षे करीत आहे. मूळचा पश्चिम बंगाल येथील असलेल्या या कारागिरांचे ओतारी गल्लीत छोटे दुकानही आहे. याठिकाणी रविवारी रात्री ८.३० वाजता तिघेजण तेथे आले व आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत अचानक धाड टाकली. तसेच चौकशीसाठी आमच्यासोबत यावे लागेल असे सांगत सोबत दागिने व रक्कम ही घ्यावी लागेल, असेही बजावले.त्याप्रमाणे संबंधित कारागिर त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाला. त्यानंतर एका कारमधून मुंबईच्या दिशेने घेऊन गेले. मात्र, महामार्गावरच माणगाव येथे संबंधित कारागिरास सोडून दिले आणि ते तिघेजण मुंबईकडे गेले. त्यानंतर काही वेळातच संबंधित कारागिराने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच त्यांचे वर्णनही सांगितले.
पोलिसांनी त्यावेळी संबंधित गाडीचा माग घेतला. त्यामध्ये ते पुण्याच्या दिशेने गेल्याचे समजले. त्यानुसार पुणे येथे त्या तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडील मुद्देमालही जप्त केला आहे. चिपळूण पोलिसांचे एक पथकही पुणे येथे गेले आहेत.