रत्नागिरी : समुद्रामध्ये दिवसरात्र काम करणारे मच्छीमार, बोट चालवणारे, कोळी बांधव यांच्यामध्ये एकोपा निर्माण करणे, सागर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पाेलिस दलातर्फे ‘रत्नसागर राजा - बिगर यांत्रिकी (पगार)’ स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या स्पर्धेत रत्नागिरीतील ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला हाेता. या स्पर्धेत माेजाम माेहम्मद मिरकर व सिकंदर कासम भाटकर (दाेघेही रा. भाट्ये) या जाेडीने प्रथम क्रमांक पटकावला.तसेच अल्तमश ताजुद्दीन होडेकर व मिलाद अब्छुल्ला सोलकर, (दोघेही रा. भाट्ये) व बिलाल रशिद साेलकर व शाेएब शफिक बुड्ये (दाेघेही रा. कर्ला) यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते बक्षीस देऊन गाैरविण्यात आले.काेकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शनिवारी (११ मार्च) रत्नागिरीतील कर्ला जेट्टीच्या सागरी किनाऱ्यावर मिशन सागरअंतर्गत ही स्पर्धा घेण्यात आली. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरूवात करण्यात आली.यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, चिपळूणचे सचिन बारी, खेडचे शशिकिरण कशिद, रत्नागिरीचे पाेलिस निरीक्षक विनित चौधरी, सुरक्षा शाखेचे सहायक पाेलिस निरीक्षक अविनाश केदारी, रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकाचे सहायक पाेलिस निरीक्षक मनोज भोसले, कर्ला ग्रामपंचायतीचे सरपंच जबिन शिरगावकर, उपसरपंच समीर भाटकर, कर्ला मच्छिमार सोसायटीचे माजी अध्यक्ष नदीम सोलकर यांच्यासह सुमारे ४०० स्थानिक ग्रामस्थ यावेळी उपस्थित हाेते.
सागरी सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्हा कटिबद्ध आहे. सर्व नागरिकांनी त्यासाठी पोलिस दलाला सहकार्य करावे. वेळोवेळी माहिती व मदतीसाठी ११२ व १०९३ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. - धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी.