रस्त्याची दुरवस्था
राजापूर : शहरानजीकच्या शीळ, गोठणे-दोनिवडे, चिखलगाव मार्गावर नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यालगतच्या दरडीशिवाय झाडेही कोसळली आहेत. त्यामुळे नदीकडील बाजूला संरक्षक भिंत उभारण्यासाठी डोंगराच्या बाजूने संरक्षक जाळी बसविण्याची मागणी होत आहे.
टँकर रवाना
रत्नागिरी : चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जयगड सागरी पोलीस स्थानक व जेएसडब्ल्यू कंपनीतर्फे दोन पाण्याचे टँकर रवाना करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस नाईक सचिन वीर यांनी यासाठी पुढाकार घेऊन नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले आहे.
विद्यार्थ्यांचा गुणगौरव
दापोली : शहरातील प्रभू आळीतील श्रीराम क्रीडा मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कवी जयवंत चव्हाण यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मंगला सणस यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष राकेश कोटीया यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रवेश प्रक्रिया सुरु
मंडणगड : तालुक्यातील आंबडवे येथे विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन व मुंबई विद्यापीठाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
भातपिकाचे नुकसान
राजापूर : मुसळधार पर्जन्यवृष्टी व पुरामुळे नदीकिनारील भागातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनातर्फे पंचनामे सुरु असून, फळबागायतीचे ४८.५५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेकडो एकर भातशेती अनेक दिवस पाण्यात राहिल्याने भात कुजल्याने नुकसान झाले आहे.