रत्नागिरी : तुमच्यासाठी ही बातमी आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हसत हसतच प्रसारमाध्यमांना सांगितले. कारण त्यांच्या गाडीत शिवसेना नेते आणि प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत बसले होते.मंत्री चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाची नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गाडीमध्ये किरण सामंत हेही उपस्थित होते. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून किरण सामंत राजकारणात अधिक सक्रिय झाले आहेत. याआधीही ते सक्रिय होते. मात्र तेव्हा ते पडद्याआड राहणेच पसंत करत होते. मात्र आता ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची सातत्याने चर्चा होत आहे. अशा स्थितीत ते चव्हाण यांच्यासोबत एकाच गाडीतून आढळल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.रवींद्र चव्हाण यांच्याशी सामंत यांचे अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध असले तरी महायुती झाल्यानंतर ते अधिक घट्ट झाले आहेत. लोकसभा निवडणुकाजवळ येत असल्यामुळे हा साथ साथ दौरा चर्चेचा झाला आहे.
मंत्री रवींद्र चव्हाणांच्या कारमध्ये किरण सामंत, प्रसारमाध्यमांना चव्हाण म्हणाले..
By मनोज मुळ्ये | Published: September 14, 2023 12:29 PM