रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीला शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळेल, हे अजून निश्चित नाही. निवडणुकीला उभे राहायचे की नाही, हा निर्णय माझे थोरले बंधू किरण सामंत स्वत: घेतील. मात्र जर ते उभे राहिले तर शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने तीन लाखांच्या फरकाने निवडून येतील, याची मला खात्री आहे, असे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.उद्योजक किरण सामंत अनेक वर्षे राजकारणात कार्यरत आहेत. मात्र ते नेहमी पडद्यामागे होते. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून ते पडद्यासमोर येऊन कार्यरत झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत आहे. कार्यकर्ते, नेते त्यांना आग्रह करत आहेत. याबाबत प्रथमच मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे.माझ्या राजकारणाचे निर्णय मी घेतो. तसेच त्यांच्या राजकारणाबाबतचा निर्णय ते स्वत: घेतील. ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत आहेत. जर त्यांनी उभे राहण्याचे ठरवले आणि शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली तर शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांच्या मदतीने ते तीन लाखांच्या फरकाने विजयी होतील, याची मला खात्री आहे, असे मंत्री सामंत म्हणाले. त्यांची स्वत:ची तशी मानसिकता व्हायला हवी आणि त्यांनी ती करावी, असे मी तुमच्यामार्फतच सांगतो, असेही मंत्री सामंत मिश्किलपणे म्हणाले.
लोकसभेची जागा भाजप लढवणार, असे भाजपचे प्रमोद जठार म्हणाले आहेत. या त्यांच्या भावना आहेत. कदाचित ते इच्छुक असतील. मला माहिती नाही. अर्थात उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, रत्नागिरी भाजप लढवेल ते त्यांचे अधिकार आहेत. त्यावर ते, एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
आम्ही नागपूर मागितले तर कसे दिसेललोकसभेसाठी आमचे कार्यकर्ते नागपूरची जागा लढवतो म्हणाले तर कसे दिसेल? मतदार संघाची मागणी कोणीही करु शकतो. पण ती संयुक्तिक असायला हवी, एवढंच आपले मत असल्याचे ते म्हणाले.