दापोली - किरीट सोमय्या २६ मार्चला म्हणजेच शनिवारी दापोली दौऱ्यावर येत आहेत. अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरूड येथे रिसॉर्ट असल्याचा आरोप करत, हे अवैध रिसॉर्ट तोडुया, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. तर, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे प्रभारी तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी सोमय्या याना दापोलीतच रोखून धरणार असल्याचा ईशारा दिला आहे.
किरीट सोमय्या यांनी, मिलींद नार्वेकर यांचा बंगला तुटला, आता अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडूया, असा इशारा देत, चलो दापोली, असे ट्विट केले आहे.
किरीट सोमय्या यांच्यामुळे कोकणातील दापोली मुरूड येथील पर्यटन उद्योजकांना नोटिसा आल्या आहेत. जर कोकणातील पर्यटन उद्योगाच्या आड कुणी येणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संजय कदम यांनी दिला आहे. याच बरोबर, दापोली शहरातच सोमय्या यांना वापस चले जाव, असे म्हणत रोखण्याचा इशाराही त्यांनी बुधवारी नगरपंचायत येथे पत्रकार परिषदेत दिला. या इशाऱ्यानंतर आता शनिवारी दापोलीतील शिवसेना-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे. यामुळेच आता सोमय्या यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.