रत्नागिरी : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली असून, ५ एकरपेक्षा कमी शेतीक्षेत्र असलेल्या १ लाख ७५ हजार ४१० शेतकऱ्यांची नोंदणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.गावनिहाय यासाठीच्या याद्या तयार करण्याच्या कामात महसूल विभागाचे आणि कृषी विभागाचे कर्मचारी गुंतले आहेत. यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांची संख्या चिपळूण तालुक्यात असून, संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे.पाच एकरपेक्षा कमी शेतीक्षेत्र असलेला शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. या योजनेंतर्गत कुटुंबाला प्रतिवर्षी ६ हजार रूपये तीन टप्प्यात देण्यात येणार आहेत. कुटुंबामध्ये पती-पत्नी आणि त्यांची १८ वर्षांच्या आतील मुले यांचा समावेश असेल.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गावनिहाय शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दिनांक २० फेब्रुवारी २०१९पर्यंत शेतकऱ्यांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी गावपातळीवर प्रसिद्ध करून हरकती घेणे आणि त्यानंतर दुरूस्तीसह अंतिम याद्या तयार करुन तहसीलदारांकडे सादर केल्या जाणार आहेत.
या कामासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेत प्रारंभी आॅफलाईन काम करण्यात आले व त्यानंतर आॅनलाईन माहिती भरण्यात येणार आहे.