शिवाजी गोरेदापोली : दर्या सागरा आमचे रक्षण कर, तुझ्या जिवावर आमची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे तूच आमचे रक्षण कर, अशी प्रार्थना करीत हजारो मच्छीमारांनी समुद्राला नारळ अर्पण केला. दोन वर्षे कोरोना आणि वादळी वाऱ्यामुळे मेटाकुटीला आलेल्या मच्छिमारांनी येणारा हंगाम तरी सुखाचा राहू दे, असे साकडेही दर्या सागराला घातले.
कोळी बांधवांचा सण अशी ओळख असलेली नारळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. कोरोनामुळे गेले दोन वर्षे नारळी पौर्णिमेचा उत्सव अगदी थोडक्या लोकांमध्येच केवळ उपचार म्हणून साजरा करण्यात आला होता. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने कोळी बांधवांनी सर्व पारंपरिक पद्धतींचा अवलंब करीत हा सण साजरा केला. आबालवृद्धांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून कोळी गीतावर ठेका धरत, शोभायात्रा काढली.
नारळी पौर्णिमेचे यजमान मंडळी म्हणून गोरेवाले मंडळ, तसेच शेतवाडी तुरेवाले, रस्तावाले, जुनी कुलाबकर, नवीन कुलाबकर, विठाबाई मंडळ, वाडीवाले मंडळ, मधली आळी मंडळ, श्रीराम हायस्कूल जिल्हा परिषद मराठी शाळा व सर्व पाजपंढरी ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. खंडेरायाच्या वेशभूषेतील तरुण, भारत माता साकारलेली चिमुरडी हे या शोभायात्रेचे खास आकर्षण झाले होते.
मासेमारीवरील बंदी 1 ऑगस्टपासून उठविली जात असली, तरी अनेक मच्छीमार नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करूनच समुद्रात होडी लोटतात.