प्रशांत सुर्वेमंडणगड : कासवांचे गाव म्हणून ओळख निर्माण केलेले तालुक्यातील वेळास गाव आजही पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षितच राहिले आहे. कासव महाेत्सव हाेताे कधी, संपताे कधी याची माहितीच दिली जात नसल्याने कासव महाेत्सवानिमित्त येणाऱ्या पर्यटकांची प्रतीक्षाच आहे. तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या वेळास गावाला राजाश्रयाची गरज असून, वेळास गावाचे ‘ब्रॅण्डिंग’ हाेणे गरजेचे आहे.तालुक्याला लाभलेल्या निसर्गसौंदर्याला व येथील वातावरणाला मुंबई, पुणेसारख्या शहरवासीयांनी ‘सेकंड होम’ म्हणून पसंती दर्शवली आहे. मात्र, तालुक्यातील पर्यटनस्थळाचे ‘ब्रॅण्डिंग’ न झाल्याने पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. कासवांचे गाव म्हणून वेळास पर्यटकांच्या नकाशावर आले. मात्र, त्याची प्रसिद्धी न झाल्याने पर्यटक फिरकत नाहीत.कासव महाेत्सवासंदर्भात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व पर्यटन विभागाकडून कोणतीच प्रसिद्धी केली जात नाही. त्यामुळे या महाेत्सवाबाबत वेळासवगळता तालुक्यातील जनता दूरच आहे. इच्छा असूनही अनेक निसर्ग, पर्यावरण व प्राणीप्रेमींना कासवांचा जन्मोत्सव पाहता येत नाही. पर्यटकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला लाखो रुपये उत्पन्न मिळत असले तरी ग्रामपंचायत स्तरावरून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे निसर्गसाैंदर्य असूनही पर्यटनाच्या दृष्टीने तालुका मागेच राहिला आहे.
मुलभूत सुविधांकडे दुर्लक्षसमुद्रकिनारी स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधाही नाही. या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. मंडणगड तालुक्यातील एकमेव असलेल्या या पर्यटन केंद्राकडे शासनानेच वेळीच लक्ष देणेे गरजेचे आहे.
पर्यटक थांबू शकतीलयेणाऱ्या पर्यटकांना बाणकोट किल्ला, डाॅ. बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवे, मंडणगड किल्ला, पणदेरी लेणी, केशरनाथ मंदिर यांसारख्या पर्यटनस्थळांना भेट देता येऊ शकेल. त्यामुळे तालुक्यात आलेला पर्यटक एक दिवस तालुक्यात थांबवणे शक्य होणार आहे.
महाेत्सवाबाबत अनभिज्ञमहाेत्सवाबाबत प्रशासकीय अधिकारी ते लोकप्रतिनिधी यांना याबाबत कोणतीच कल्पना नाही. किती वर्षांपासून कासव महाेत्सव सुरू आहे? किती घरटी संरक्षित केली? किती पर्यटक येतात? त्यांची व्यवस्था काय अशा अनेक प्रश्नांबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी नि:शब्द होतात.
हाेम - स्टे संकल्पनागावात हाॅटेलला एकमताने विरोध करत ‘होम-स्टे’ संकल्पना राबविण्यात आली. या माध्यमातून रोजगारही उपलब्ध झाला. हाच पॅटर्न इतर ठिकाणी राबवल्यास पर्यटनास चालना मिळेल.
कासव संवर्धन२००२ साली कासव संवर्धनाकरिता प्रयत्न सुरू करण्यात आले, तर २००६ पासून कासव महाेत्सवाचे आयाेजन करण्यात येत आहे. कासवांच्या संवर्धनासाठी ग्रामस्थांना परावृत्त करण्यात आले. यात ग्रामस्थांनी १०० टक्के प्रतिसाद दिला.